Balasaheb Thackeray On Wife: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री आणि शिवसेनेची स्थापना करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे. उद्धव ठाकरेंनी सपत्नीक आत मुंबईमधील मीनाताई ठाकरे स्मारकाला भेट देऊन आपल्या आईच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली. मात्र फारच कमी लोकांना महाराष्ट्राच्या राजकारणामधील सर्वात प्रभावशाली स्थानिक पक्षापैकी एकाला जन्म देणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या सदैव पाठीशी राहिलेल्या मीनाताई ठाकरेंबद्दल ठाऊक आहे. मीनाताई ठाकरेंच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात काही खास गोष्टी...
मीनाताई ठाकरेंच्या जन्म 6 जानेवारी 1932 रोजी झाला होता. त्यांचं माहेरचं नाव सरला वैद्य असं होतं. 13 जून 1948 साली त्यांचं बाळासाहेब ठाकरेंशी लग्न झाल्यानंतर त्या मीना ठाकरे नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. बिंदुमाधव, जयदेव आणि उद्धव अशी तीन मुलं झाली. मीनाताईंचा मृत्यू 6 सप्टेंबर 1995 रोजी कर्जतमध्ये झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र फार कमी लोकांना हे ठाऊक आहे की मीनाताई ठाकरेंच्या मृत्यूनंतर बाळासाहेबांनी 'मातोश्री' या निवासस्थानातील देवी-देवतांचे सर्व फोटो काढून टाकले होते. बाळासाहेबांनीच यासंदर्भातील खुलासा एका मुलाखतीमध्ये केला होता.
बाळासाहेबांनी, "माझी पत्नी खूप धार्मिक, श्रद्धाळू आणि धार्मिक होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. मी मुंबईमध्ये गणेश चतुर्थीच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आम्ही आणीबाणी विसारलो. तिच्या औषधाची बाटली घेऊन कर्जतला गेलो होतो दिशाभूल केली," असं पत्नीच्या आठवणींबद्दल बोलताना म्हटलं होतं. तसेच बाळासाहेबांनी पत्नीच्या मृत्यूनंतर धार्मिक विश्वासाचा त्याग केला. ते अज्ञेयवादी झाले. त्यांनी स्वामी गगनगिरी महाराजांनी दिलेल्या रुद्राक्ष माळेचाही त्याग केला. त्यांनी घरातील गणपतीची सर्व चित्रं काढून टाकली होती. "जेव्हा तिला गरज होती तेव्हा औषध नव्हते आणि आम्ही तिला गमावले. गरज असतानाच देव तुमच्या मदतीला आले नाहीत तर काय उपयोग?" असा सवाल बाळासाहेबांनी मुलाखतीमध्ये बोलताना उपस्थित केलेला. "मी माझ्या घरातून गणेशाची सर्व चित्रं काढून टाकली आहेत. पण तिचा फोटो तिथे असेल," असं बाळासाहेब म्हणालेले.
बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दकीने बाळासाहेबांची भूमिका साकारलेली तर मीनाताईंची भूमिका अभिनेत्री अमृता रावने साकारलेली.