मुंबई : आज सरत्या वर्षाला अखेरचा निरोप देण्यासाठी प्रत्येक जण सज्ज झाले आहेत. सरत्या वर्षाला बाय-बाय करण्यासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तर या पार्ट्यांमध्ये काही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. नववर्षाचं स्वागत नागरिकांना शांततेत करता यावं यासाठी, ठाणे शहर पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
ठाणे शहरातले तलाव, खाडी आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्वच मुख्य चौकात नाकाबंदी लावण्यात आली आहे. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी ५५० पोलीस अधिकारी, ४ हजार पोलीस आणि ४५० वाहतूक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.
थर्टीफर्स्टच्या निमित्ताने पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अशा पार्ट्यांमध्ये मद्यपान अथवा अमली पदार्थांचे सेवन होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख केली आहे.
ठाणे शहरातील तलाव, खाडी किनारा, हॉटेल्स आणि इतर महत्वाच्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच छेडछाडीचे प्रकार होवू नयेत म्हणून सध्या वेशातील विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.
घतपाताचे प्रकार घडू नयेत म्हणून डॉग व अँटी सेबोटेज चेकिंग करण्यात येणार आहेत. मालमत्ते विरुद्धचे गुन्हे घडू नयेत म्हणून पोलीस पायी पेट्रोलिंग करणार आहेत. तसेच शहरातील सर्वच प्रमुख चौकात नाकाबंदी करून ड्रकं अँड ड्राइव्ह कारवाई मोहीम राबविण्यात येणार आहे.
वाहनचालकाच्या हालचालीवर संशय आल्यास त्याची ब्रेथ अॅनालायझर मशिनद्वारे तपासणी करून मद्यपान केले आहे का? हे तपासले जाणार आहे. अशा मद्यपी चालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची फिरती पथकेही तयार करण्यात आली आहेत.
त्यासाठी वाहतूक शाखेचे ८० पोलीस अधिकारी आणि ४५० पोलीस कारवाई मोहिमेत सहभागी होणार आहेत. तर विविध पोलीस स्टेशन, मुख्यालय आणि राखीव पोलीस असे मिळून सुमारे ६ हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. तर ५५० पोलीस अधिकारी देखील परिस्थितीवर नियंत्रण ठेवून राहणार आहेत.