मुंबई: भीमा- कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात येणार आहे. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. फडणवीस सरकारच्या काळात सत्ता आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून चुकीच्या लोकांना यामध्ये गोवण्यात आल्याचेही पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.
कोरेगाव- भीमा दंगल भाजप सरकारचे षडयंत्र; शरद पवारांचा गंभीर आरोप
या पार्श्वभूमीवर अॅड. प्रदीप गावडे यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाकडे शरद पवार यांची साक्ष नोंदवून घेण्याची मागणी केली होती. पवारांकडे या दंगलीविषीय अधिकची माहिती आहे का?, याची खातरजमा करण्यासाठी त्यांना बोलवावे, असे अॅड. प्रदीप गावडे यांनी म्हटले होते. ही मागणी मान्य करत आयोगाने आता शरद पवार यांना साक्षीसाठी पाचारण करण्याचा निर्णय घेतला. कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात येईल. त्यांना साक्षीसाठी बोलवण्यात येईल, असे न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी सांगितले.
भीमा कोरेगाव प्रकरण: संभाजी भिडे आणि एकबोटेंवर शरद पवारांचे गंभीर आरोप
केंद्र सरकारने एल्गार परिषद प्रकरणात तपास राज्य सरकारकडून काढून घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारपरिषद घेतली होती. त्यावेळी पवार यांनी कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा सहभाग असल्याचे म्हटले होते. यापूर्वी लोक शांततेने भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमत होते. त्यावेळी स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्यांमध्ये कटुता नव्हती. मात्र, २०१७ मध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी आजुबाजूच्या खेड्यांमध्ये फिरून वेगळ्याप्रकारचे वातावरण निर्माण केले, असे शरद पवार यांनी म्हटले होते.