बर्ड फ्लू रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज, पालिकेकडून गाईडलाईन्स जारी

 बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभुमीवर राज्यभरात नियंत्रण कक्ष उभारणार

Updated: Jan 12, 2021, 01:39 PM IST
बर्ड फ्लू रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज, पालिकेकडून गाईडलाईन्स जारी  title=

मुंबई : बर्ड फ्लू रोगाच्या प्रादुर्भावामुळे चिकन खरेदीत 50 टक्क्यांनी घट झालीय. जिवंत कोंबडी आणि चिकनच्या दरात मोठी घसरण दिसून आलीय. कोबंड्यानंतर कावळे, साळुंखी यांचा संशयास्पद मृत्यूचे प्रकार समोर येतायत. बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभुमीवर राज्यभरात नियंत्रण कक्ष उभारले जाणार आहेत. जिल्ह्याजिल्ह्यातील पशुवैद्यकीय यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.   बर्ड फ्लूबाबत मुंबई महापालिकेने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. मृत पक्षी आढळल्यास महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. 

आपात्कालीन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना तातडीने ऑन ड्युटी सह अभियंत्याला संपर्क कऱण्यास सांगण्यात आलंय. मत पक्षी आढळले तर त्यांची विल्हेवाट महापालिकेच्या नियमांनुसारच कर्मचाऱ्यांनी लावावी असं या नियमावलीत नमूद केलंय. 

बर्ड फ्लूसाठी राज्यात नियंत्रण कक्ष उभारणार

तसंच चिकन मटण दुकानांची स्वच्छता तपासली जाणार आहे. 

मृत पक्षी आढळल्यास त्याची माहिती नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन

भायखळा येथील राणीबागेत देखील स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होतंय. पक्षांच्या स्वच्छता आणि अधिक देखरेखेखाला ठेवण्यात आलंय. 

परभणीत शिरकाव 

परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर, परभणीच्याच सेलू तालुक्यातील कुपटा गावातही पाचशे गावरान कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. मात्र,हे मृत्यू नेमके कशाने झाले अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, जिल्हाधिकारी डी एम मुगळीकर यांनी कुपटा गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. इथे कोंबड्यांची खरेदी विक्री आणि वाहतूक करण्यास मज्जाव करण्यात आलाय, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी,तलाठी,आरोग्य  अधीकाऱ्यांनी  कुपटा गावात जाऊन कोंबड्यांची गणना सर्वेक्षण केलं आहे. तर,पाच कोंबड्यांचे नमुने घेऊन पुणे आणि भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत.

अमरावतीत धोका नाही 

राज्यात परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला असला तरी अमरावती जिल्ह्यात कुठेच सध्या बर्ड फ्लूचा कुठलाही धोका नाही. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पशुसंवर्धन विभागानं नागरिकांना केलंय. तसंच पोल्ट्री व्यावसायिकानीं स्वच्छता पाळावी आणि नागरिकांनाही अंडे चिकन खाणे बंद करू नये असं पशुसंवर्धन विभागानं म्हटलंय. काल बडनेरामध्ये 40 कोंबड्याचा अचानक मृत्यू झाल्यानं भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये पसरलं. परंतु त्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लुनं झाला असावा असं कुठलंही लक्षण नसल्याचं पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केलंय.