मुंबई : सत्ता गेल्यानंतर भाजप आणि भाजप नेते महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. नव्या सरकारचं बहुमत सिद्ध होण्यापूर्वीच विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं टीकेची झोड उठवली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नव्या सरकारवर ट्विटरवर टीका केली आहे. कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचे नेते सध्या नव्या ठाकरे सरकारच्या शपथविधीवरून टीका करत आहेत. या शपथविधीत राज्यघटनेच्या नियमांची पायमल्ली झाल्याची टीका करण्यात येते आहे. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही टीका केली आहे. सेक्युलर सरकार या घोषणेवरही दानवेंनी टीकास्त्र सोडलं आहे. तीनही पक्षात समन्वयाचा अभाव आहे. काल शपथविधी झाला. आज पदांवरून भांडणं सुरू झाली आहेत असं दानवे म्हणाले. बाळासाहेब आज असते तर काँग्रेस राष्ट्रवादीसह गेले नसते असं दानवेंनी सुनावलं आहे.
दरम्यान आज महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील नावाची पाटी बदलण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे असं संपूर्ण नाव पाटीवर लिहिण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे मंत्रालयात येण्यापूर्वीच ही सर्व तयारी करण्यात आली होती. कार्यालयाचं प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आलं आहे. प्रवेशद्वारावर फुलांची आरास करण्यात आली आहे.