मुंबई : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. स्कॉर्पिओ, इनोव्हा नंतर आता NIAच्या रडारवर एक मर्सिडीज कार आली आहे. NIAनं एक मर्सिडिज कार जप्त केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार मनसुख हिरेन यांची गाडी ज्यादिवशी खराब झाली त्याच दिवशी ते कॅबनं मुंबईत आले होते. मुंबईतलं काम आटोपल्यानंतर त्यांच्यासाठी एक व्यक्ती मर्सिडिज कार घेऊन आला होता. त्याच कारनं ते ठाण्यात परतले. ही मर्सिडीज कार कुणाच्या मालकीची आहे. हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
NIAनं जप्त केलेले काळ्या रंगाची मर्सिडीज कार ही कोणाची अशी चर्चा आता सुरु झाली आहे. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या कार्यालयात NIA नं झाडाझडती घेतली. या झाडाझडती दरम्यान सचिन वाझेंच्या कार्यालयातून मोबाईल, लॅपटॉप आणि काही कागदपत्रं NIAनं जप्त केली आहेत. विशेष म्हणजे या छाप्याची मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना नव्हती.
दरम्यान आज या प्रकरणावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या प्रकरणात योग्य ती कारवाई करणात येईल. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार. अधिकारी बदली हा राज्याच्या प्रमुखानचा निर्णय आहे. धागेदोरे कुठे जातील हे पाहत आहोत. चौकशी पूर्ण होई पर्यंत कोणाला दोष देऊ नका. एनआयए त्यांच काम करतेय. एटीएस त्यांचं काम करत आहे. वझे बाबत आम्ही तातडीने कारवाई केली.' परमवीर सिंग बदलीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, जोपर्यंत ठोस पुरावा येत नाही तो पर्यंत आहे तेच अधिकारी आपलं काम करत राहतील.'