मुंबई : मुंबईत एक प्रभाग एक गणपती राबवण्याचे मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना आवाहन केले आहे. अंधेरी पश्चिम इथं पालिकेच्या के पश्चिम विभागाच्या वतीने हे आवाहन करण्यात आलं आहे. या विभागात १५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं असली तरी १३ प्रभागात १३ सार्वजनिक गणेशमूर्ती स्थापन करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. कोविड संकटात गर्दी होवू नये, यासाठी पालिकेने हे आवाहन गणेश मंडळांना केलं आहे.
एका प्रभागात एकच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून इतर ठिकाणी कोविडचे स्क्रिनिंग कॅम्प, रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेने संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई सारख्या ठिकाणी गर्दी रोखण्याचं आव्हान महापालिकेपुढे आहे. त्यामुळे सणांच्या काळात गर्दी होऊ नये म्हणून पालिका मंडळांना आणि नागरिकांना आवाहन करत आहे.