तातडीच्या सुनावणीस नकार; आर्यनच्या सुटकेची 'मन्नत' आता 'या' दिवशी पूर्ण होणार?

आर्यन खानच्या भेटीला शाहरूख खान आर्थर रोड जेलमध्ये 

Updated: Oct 21, 2021, 11:03 AM IST
तातडीच्या सुनावणीस नकार; आर्यनच्या सुटकेची 'मन्नत' आता 'या' दिवशी पूर्ण होणार?

मुंबई : आर्यन खानच्या जामिनाकरता शाहरूख खानने हायकोर्टात धाव घेतली आहे. NDPS कोर्टाच्या आदेशाविरोधात अर्ज दाखल करण्यात आला आहे.  आज यावर सुनावणीची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता ही सुनावणी मंगळवारी होणार आहे. 

आर्यन खान प्रकरणावर तातडीनं सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार दिला आहे. त्यामुळे आर्यन खानचा जेलमधील मुक्काम आणखी वाढला आहे. आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून आर्थर रोड जेलमध्ये आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यानं जामीन अर्जासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. आज शाहरूख खान आणि गौरी खानने मुलगा आर्यन खानची आर्थर रोड जेलमध्ये भेट देखील घेतली 

मुंबईच्या सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने आर्यन खानच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत. आधी किल्ला कोर्टाने जामीन फेटाळला त्यानंतर काल सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. त्यानंतर आर्यन खानने त्वरित उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  हायकोर्टात आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार  होती. मात्र आता ही सुनावणी मंगळवारी होणार आहे.. दरम्यान आर्यनची न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं न्यायालयीन कोठडी वाढवण्यासाठी एन सी बी किल्ला कोर्टात मागणी करणार आहे.

बदललेल्या नियमांमुळे झाली बाप - लेकाची भेट 

कोरोना निर्बंध शिथिल करून, आजपासून म्हणजेच 21 ऑक्टोबरपासून, कैदी/विचाराधीन कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. या बदलानंतर, आजपासून जास्तीत जास्त दोन नातेवाईक किंवा वकील कैद्यांना भेटू शकतील. अशा परिस्थितीत, शाहरुख खान, जो आपल्या मुलाला गेल्या काही दिवसांपासून भेटू शकला नाही, तो सकाळीच मुलाला भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचला .