मुंबई : बिल्डर संजय अग्रवाल यांनी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. चेंबूर सिंधी कॉलनीतील त्यांच्या घरात आवाज आला. त्यावेळी शेजारी लोक धावून गेलेत. त्यावेळी बिल्डर संजय अग्रवाल हे रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे दिसून आले. मात्र, त्यांनी कोणत्या वादातून ही आत्महत्या केली का, याचा पोलीस शोध घेत आहेत. गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली.
संजय अग्रवाल यांनी रिव्हॉल्व्हरमधून स्वत:वर गोळी झा़डून घेत आत्महत्या केली. राजावाडी रुग्णालयात संजय यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. चेंबूरच्या येथे त्यांचा एक प्रकल्प सुरु होता. या प्रकल्पाला विलंब होत असल्याने ते तणावाखाली होते, असे कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.
संजय अग्रवाल यांचा मूळ केमिकलचा व्यवसाय होता. त्यांनी तो २० वर्ष केला. त्यांची कंपनी देशातील आघाडीच्या औषध कंपन्यांना केमिकलचा पुरवठा करायची. १९९९ मध्ये त्यांनी सुनील गुप्ता यांच्यासह संजोना बिल्डर्सची स्थापना केली. मार्केटिंग, फायनान्स आणि प्रशासनाचा अनुभवाच्या बळावर त्यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक सुरु केली. ते संजोना बिल्डर्सचा चेहरा होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत.