मध्य रेल्वेनं फुकट्यांकडून वसूल केले १५४ कोटी रुपये

मध्य रेल्वेने फुकट्यांकडून सुमारे १५४ कोटी रूपये वसूल केले आहेत.

Updated: Apr 21, 2018, 06:13 AM IST
मध्य रेल्वेनं फुकट्यांकडून वसूल केले १५४ कोटी रुपये title=

मुंबई : मध्य रेल्वेने फुकट्यांकडून सुमारे १५४ कोटी रूपये वसूल केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम १९.५८ टक्के जास्त आहे. मध्य रेल्वेने बेकायदेशीर सामनाची वाहतूक तसेच विनातिकीट प्रवास करणार्‍या फुकट्या प्रवाशांविरोधात राबवलेल्या मोहिमेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३१.४५ लाख केस दाखल करून तब्बल १५३.८२ कोटी रूपयांचा दंड वसूल केला आहे.

विनातिकीट प्रवास करणे, बुक न करता सामानाची वाहतूक करणे याविरोधात रेल्वे सुरक्षा बल तसेच दक्षता पथकांमार्फत कारवाई केली जाते. मार्च २०१८ मध्ये आरक्षित तिकीट हस्तांतर केल्याच्या प्रकरणात एकूण १९९ केस दाखल करण्यात आल्या. अशा लोकांकडून १.८१ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

गेल्यावर्षी २०१६-१७ या आर्थिक वर्षात याच प्रकरणात २६.८८ लाख केस दाखल झाल्या होत्या. त्यामुळे केस दाखल होण्याच्या प्रमाणात यंदा १६.९९ टक्के वाढ झाली आहे. यंदा या मोहिमेत १५३.८२ कोटी रूपयांचा दंड वसूल झाला तर गेल्यालवर्षी याच काळात १२८.६३ कोटी रूपयांचा दंड वसूल झाला होता. दंडाच्या प्रमाणात यंदा १९.५८ टक्के वाढ झाली आहे. प्रवाशांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी योग्य व अधिकृत तिकीटांवरच प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले आहे.