मुंबईच्या पंकजने चित्रातून साकारलाय केरळचा 'पुरम महोत्सव'

Updated: Apr 20, 2018, 10:29 PM IST

मुंबई : केरळमध्ये 'पुरम'नावाचा पारंपारिक सोहळा वर्षानुवर्षे सुरू आहे. या सोहळ्यास हजेरी लावणाऱ्यास स्वर्गात आल्याचा आनंद मिळतो अस म्हणतात. दीर्घदंती म्हणजेच हत्तीची भव्य मिरवणूक हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण मानले जाते. एप्रिल महिन्याच्या २४ तारखेला केरळमध्ये हा उत्सव सुरू होतोय. या उत्सवाला हजेरी लावणं ही एक पर्वणीच पण तुम्हाला या ठिकाणी पोहोचता येत नसेल तरी काळजी करू नका. कारण मुंबईमध्ये या सोहळ्याचे हुबेहुब चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संवेदनशील चित्रकार पंकज बावडेकर याने हा सोहळा आपल्या पेंटींग्जमधून समोर आणलाय. जहांगिर कला दालनात २४ एप्रिलपासून या पेंटीग्ज सर्वांना पाहण्यासाठी खुल्या राहणार आहेत.  

पूरम सोहळा 

या सोहळ्यात हत्तींचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. मलाली दिनदर्शिकेनुसार कुम्हम महिन्याच्या सातव्या दिवशी पूरम दिवस साजरा केला जातो. सजवलेले हत्तीकडून पारंपारिक वाद्यावर नृत्य करत मिरवणूक काढली जाते. या यात्रेमध्ये हजारो यात्रेकर सहभागी होत असतात.

पंकज बावडेकरविषयी 

पंकजला पेंटीग्जसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच स्टायलाईज्ड निसर्गचित्रासाठी प्रफुल्ला डहाणुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पारंपारिक कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन पंकजच्या चित्रांमधून नेहमीच मिळत असतो. वांद्र्याच्या एल.एस.रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केलयं.