close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबई पूल दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख तर जखमींना 50 हजार मदत- मुख्यमंत्री

सीएसएमटी स्टेशनजवळी पादचारी पूल कोसळल्याची दुर्घटना नुकतीच घडली आहे. 

Updated: Mar 14, 2019, 10:51 PM IST
मुंबई पूल दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख तर जखमींना 50 हजार मदत- मुख्यमंत्री

मुंबई : सीएसएमटी स्टेशनजवळी पादचारी पूल कोसळल्याची दुर्घटना नुकतीच घडली आहे. या पुलाचा मधला भाग कोसळला आहे. सीएसटीएम स्थानकात जाण्यासाठी आणि तिथून बाहेर पडणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. अंजुमन इस्लाम शाळेच्या बाहेर हा पूल आहे. मुंबई महापालिकेचे मुख्यालयही त्याच मार्गावर आहे. दरवर्षी याची डागडुजी करणे महत्त्वाचे असते पण हे पूर्ण न झाल्याचेही कळत आहे. जुन्या पुलांच्या यादीत हा पूल असल्याचे सांगण्यात येत आहे. पण मुंबई पालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक पुलांच्या यादीत या पूलाची माहिती नव्हती असेही कळते आहे. हा पूल ब्रिटीश कालीन असून याची डागडूजी झाली नव्हती. यामध्ये 5 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यात दोन महिलांचा तसेच एका इसमाचा मृत्यू झाला असून 34 हून अधिक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. यातील दोन महिला या परिचारीका होत्या. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपूर्वा प्रभू (35) आणि रंजना तांबे (40) आणि भक्ती शिंदे अशी मृत महिलांची नावे आहेत. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख तर जखमींना 50 हजार सहाय्य देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. तसेच पूलाच्या पाहणीत याला किरकोळ डागडुजीची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. असे सांगणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचेही ते म्हणाले. 

हा पूल रेल्वेने बांधला ज्याची डागडुजी पालिका करत होती. याआधीच्या पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील पूलांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये या पुलाला किरकोळ डागडुजीच्या यादीत टाकण्यात आले होते असे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले. 

हा पूल रेल्वेच्या अंतर्गत येतो. याची डागडुजी पालिकेच्या अंतर्गत येतो. आम्ही याची एनओसी रेल्वेकडे मागितली होती. रेल्वेच्या ब्रीजच्या डिपार्टमेंटकडे ही एनओसी मागितली होती. पण यासंदर्भात उत्तर पण त्यांनी दिले नाही. मुंबईकरांच्या जीवावर बेतत असेल तर ही दुर्देवी घटना असल्याचे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटले आहे. 

25 मीटर लांबीचा हा पूल असून यातील 15 मीटरच्या लांबीचा स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेची चौकशी पालिका आणि रेल्वे प्रशासन मिळून केली जाईल. जखमींवर उपचार केले जातील. हा पूल खूप धोकादायक होता असे नाही पण याला डागडुजीची गरज होती. पण या काळात पूल पूर्णपणे बंद का केला नाही ? याची चौकशी होणार असल्याचे भाजपा नेते विनोद तावडे यांनी सांगितले. 

गर्दीच्या वेळी अचानक पुलाचा मधला भाग कोसळल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमींवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पुलाकडील रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात वाहतुक कोंडी झाली आहे. इथली वाहतुक क्रॉफेट मार्केटच्या दिशेने वळवण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहे. या दुर्घटनेत दोनजण दगावले आहेत.

मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर याचा काही परिणाम झाला नसल्याचेही सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेची पूर्ण जबाबदारी राज्य सरकार आणि पालिकेची असल्याचे एमआयएम आमदार वारीस पठाण यांनी सांगितले. नुसत ऑडीट करुन फायदा नाही. जे जबाबदार आहेत त्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

 एका टॅक्सीवर हा पूलाचा भाग कोसळला. जवळच्या नागरिकांनी टॅक्सी वरील मातीचा ढिगारा बाजूला काढला आणि 10 ते 15 जणांना बाहेर काढल्याचे एका नागरिकाने सांगितले.  
 
 35 हजार कोटींचा पालिकेचा बजेट आहे. पण लोकांच्या सुरक्षेची काळजी करायला पैसे नाहीत. पण वारंवार सांगूनही त्याच घटना घडत आहेत. मुंबई महानगर पालिकेला यासाठी पूर्ण जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे. दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी  मुंबई महानगर पालिकेचे विरोधी नेते रवी राजा यांनी सांगितले आहे.