close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राजकीय मंडळींना पोरांच्या पळवापळवीची चिंता

मुलांना दुसऱ्या पक्षात जाण्यापासून रोखण्याचं मोठं आव्हान

Updated: Mar 14, 2019, 06:51 PM IST
राजकीय मंडळींना पोरांच्या पळवापळवीची चिंता

मुंबई : सध्या राज्यात पोरांच्या पळवापळवीची चर्चा आहे. सुजय विखे पाटलांनी भाजपत प्रवेश काय केला आणि तमाम राजकीय मंडळींना पोरांची चिंता सतावू लागली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि राज्यात एक वेगळीच चर्चा सुरू झाली. राज्यात पोरं पळवण्याची टोळी सक्रिय झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. आव्हाडांच्या या टीकेला जोरदार उत्तर दिलं ते कल्याणचे भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी. पोरं पळवणारी टोळी सक्रिय झाली, तर मग छगन भुजबळ, गणेश नाईक आणि आनंद परांजपे यांना साहेबांनी काय कळ काढून जन्माला घातलं का? असा सवाल त्यांनी विचारला.

छगन भुजबळ, गणेश नाईक आणि आनंद परांजपे यांना साहेबांनी काय कळ काढून जन्माला घातलं का, असा सवाल त्यांनी विचारला. या पळवापळवीबरोबरच पोरांनी केलेल्या हट्टाचा मुद्दाही गाजला. मग माझ्या घरच्या पोरांचे हट्ट पुरवीन पण दुसऱ्यांच्या घरच्या पोरांचे का पुरवू, असा प्रश्न आजोबांना पडला. तर मी माझ्या घरच्याच नाही तर इतरांच्या पोरांचेही हट्ट पुरवणार, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. पोरं पळवण्याची ही चर्चा सुरूच राहिली, आई वडिलांचंच जो ऐकत नाही, तो जनतेचं काय ऐकणार, असा प्रश्न अजित पवारांना पडला. 

हे सगळं पाहता भाजप किंवा शिवसेना हे हक्काचं पाळणाघर होऊ नये अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. या सगळ्या गडबडीत आमच्या पण पोरांना पळवा की, असं नारायण राणेंचं मिमही सोशल मीडियावर व्हायरल झालं. एकंदरीतच निवडणुकीचा काळ आहे. पोरांच्या उड्या वाढण्याची शक्यता वाढली आहे. पोरांना सांभाळा....