नवी दिल्ली : राजपथचे (Rajpath) नाव बदलून कर्तव्य पथ (Kartavya Path) केले जाणार आहे. मात्र सरकारच्या निर्णयाची काँग्रेसकडून खिल्ली उडवली जात आहे. दुसरीकडे मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते मिलिंद देवरा (Milind deora) यांनी मात्र याला पाठिंबा दिला आहे. देवरा यांनी ट्विट करत म्हटले की, 'कर्तव्यपथ हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे योग्य नाव आहे.' (Milind deora support for rename of Rajpath)
काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी सरकारवर मात्र या निर्णयावरुन जोरदार टीका केली आहे.
दिल्लीच्या रायसीना टेकडीवर चढल्यानंतर, राष्ट्रपती भवन ते विजय चौक आणि इंडिया गेट, राष्ट्रीय युद्ध स्मारक ते नॅशनल स्टेडियम हा मार्ग राजपथ म्हणून ओळखला जातो. दोन्ही बाजूंनी प्रचंड हिरवळ, कालवे आणि झाडांनी वेढलेली ही अतिशय सुंदर वाट आहे.
1911 मध्ये, ब्रिटीश सरकारने राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवली, जेव्हा दिल्लीचा प्रशासकीय राजधानी म्हणून विकास सुरू झाला. या काळात किंग्सवे हे आधुनिक शाही शहराच्या कल्पनेने एडविन लुटियन्सने बांधले होते.
रस्त्याच्या बांधकामानंतर, भारताचा राजा जॉर्ज पंचम यांनी राजधानी दिल्लीला हलवण्याचा निर्णय औपचारिकपणे जाहीर केला, त्यानंतर जॉर्ज पंचम यांच्या सन्मानार्थ या मार्गाचे नाव किंग्सवे ठेवण्यात आले. तेव्हा या मार्गावरून फक्त राजांनाच जाण्याची परवानगी होती.
इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, देशातील अनेक ठिकाणांची नावेही गुलामगिरीतून मुक्त झाली, त्यापैकी एक किंग्सवे. (Kings way) 1955 मध्ये या ठिकाणाचे नाव बदलून राजपथ करण्यात आले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 सालची पहिली प्रजासत्ताक दिनाची परेड इर्विन स्टेडियमवर पार पडली. 1955 मध्ये नाव बदलल्यानंतर येथे दरवर्षी 26 जानेवारीची परेड आयोजित करण्यात आली होती.
किंग्सवे, राजपथ नंतर आता सरकार लवकरच या रस्त्याचे नाव कर्तव्य पथ करणार आहे, ज्यावर ७ सप्टेंबरला औपचारिक शिक्कामोर्तब होणार आहे.