Congress : काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस, नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत

काँग्रेसमध्ये (Congress) नाना पटोले ( Nana Patole) विरुद्ध ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यातील वाद समोर आला.  

Updated: Mar 19, 2021, 12:41 PM IST
Congress : काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस, नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत  title=

दीपक भातुसे / मुंबई : काँग्रेसमध्ये (Congress) नाना पटोले ( Nana Patole) विरुद्ध ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यातील वाद समोर आला. मंत्रीपद मिळावे यासाठी नाना पटोले प्रयत्नशील आहेत. नाना पटोले यांना राऊत याचे ऊर्जा खाते हवे आहे. नितीन राऊत यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेऊन ऊर्जा विभागाचे मंत्रीपद आपल्याला मिळावे, यासाठी नाना पटोले प्रयत्नशील असल्याची सूत्रांची माहिती आहे. नितीन राऊत यांच्या मंत्रीपदावर पटोले यांचे लक्ष असल्याने गेले दोन दिवस नितीन राऊत दिल्लीत ठाण मांडून बसले होते. (Congress: Nana Patole vs Nitin Raut)

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले थोड्याच वेळात दिल्लीत पोहोचणार आहेत. राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर दिल्लीत पोहोचल्या आहेत. तसेच सुनील केदार यापूर्वीच दिल्लीत पोहोचले आहे. तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल रात्री काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसमधील राजकीय हालचालीने वेग आला आहे. त्यातच नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुढे आला आहे.

मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात पटोले गटातून वातावरण तयार करत आल्याची नितीन राऊत यांच्या गटात चर्चा आहे. त्यामुळे नितीन राऊत नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेसमधील या नाट्यानंतर दिल्लीत बैठक होत असल्याने चर्चेला जोर आला आहे. नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत वादानंतर आता काँग्रेस श्रेष्ठी काय निर्णय घेणार याचीच उत्सुकता आहे. नाना पटोल यांना मंत्रीपद मिळणार का की त्यांची समजूत काढणार याबाबत उत्सुकता आहे. तर काँग्रेस श्रेष्ठी नितीन राऊत यांचे मंत्रीपद कायम ठेवून त्यांच्या विश्वास दाखवणार का, याचीही चर्चा आहे. नाना पटोले मंत्री पदासाठी प्रयत्नशील असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, आपले मंत्रीपद कायम राहावे, यासाठी नितीन राऊत  गेले दोन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसले होते, अशी चर्चा आहे.