महाविकासआघाडीत काँग्रेस नाराज, काँग्रेसने बोलावली महत्त्वाची बैठक

काँग्रेसमधील खदखद पुन्हा एकदा पुढे आली आहे.

Updated: Jun 11, 2020, 10:55 AM IST
महाविकासआघाडीत काँग्रेस नाराज, काँग्रेसने बोलावली महत्त्वाची बैठक title=
प्रतिकात्मक फोटो

दीपक भातुसे, मुंबई : महाविकासआघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. याच नाराजीतून काँग्रेसच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत सरकारमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक होत आहे. 

राज्यातील सध्याच्या संकटाच्या काळात घेतले जाणारे विविध निर्णय तिन्ही पक्षांनी चर्चा करुन घेणं काँग्रेसला अपेक्षित आहे. मात्र निर्णय घेताना आणि मंत्रिमंडळाच्या निर्णय प्रकियेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येते आहे. त्यात सहभाग नसल्याची काँग्रेसची धारणा झाली आहे.

महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री न मिळाल्याने देखील काँग्रेस नाराज होती. त्यानंतर विधान परिषदेत एक जागा कमी मिळाली तेव्हा ही काँग्रेस नाराज झाली. आता निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याने काँग्रेस पुन्हा नाराज असल्याची चर्चा आहे.

याआधी काँग्रेसच्या नेत्यांनी महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. स्वत: बाळासाहेब थोरात यांनी देखील याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा केली होती. पण तरी आज काँग्रेसवर बैठक घेण्याची वेळ आली आहे.

राज्य सरकारमध्ये काँग्रेसची एक तृतीयांश भागीदारी असून विधानसभा अध्यक्षपदासह महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम ही खाती काँग्रेसकडे आहेत. मात्र आता सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याची खदखद काँग्रेसमध्ये आहे.

गृह, आरोग्य ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसत आहे. कोरोनावरील उपाययोजनांमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांचा काहीही सहभाग नाही. त्यामुळे काँग्रेस नेते आणि मंत्री नाराज आहेत.