राज्यात घटनात्मक पेच; राज्यपालांच्या भेटीसाठी महाधिवक्ते राजभवनावर दाखल

राज्यात घटनात्मक पेच, पुढे काय?

Updated: Nov 7, 2019, 04:42 PM IST
राज्यात घटनात्मक पेच; राज्यपालांच्या भेटीसाठी महाधिवक्ते राजभवनावर दाखल title=
डावीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी | उजवीकडे राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी

मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालानंतर १५ दिवस झाले तरी महाराष्ट्रात सुरू झालेला सत्तासंघर्ष काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीए... 'मुख्यमंत्री' पदावरून युतीतला तिढा काही सुटताना दिसत नाहीए... त्यामुळेच विरोधी पक्षात बसायला तयार असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही राजकीय 'खाणाखुणा' सुरू आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू आहेत. परंतु, अद्याप कोणत्याही पक्षानं सत्तास्थापनेचा दावा दाखल केलेला नाही. त्यातच उद्या ८ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेची मुदत संपत आहे. तसंच सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अस्तित्वात असलेल्या सरकारची मुदतही उद्या संपतेय. यावर राज्यपाल काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय. 

त्यामुळेच राज्यात निर्माण झालेल्या या घटनात्मक पेचावर काय आणि कसा तोडगा काढावा? हा प्रश्न राज्यपालांसमोरही उभा राहिलाय. त्यामुळेच या प्रश्नावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे महाधिवक्ते (advocate general of the state) आशुतोष कुंभकोणी यांना पाचारण केलंय. काही वेळेपूर्वीच कुंभकोणी राजभवनात दाखल झालेत.

यापूर्वी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भाजपा नेत्यांनी राज्यपालांसोबत कायदेशीर बाबींची चर्चा केली. त्यांना सध्याच्या राजकीय स्थितीची माहिती दिली. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन व्हावं, अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.