शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा विरोधकांचा दावा

सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा दावा करत विरोधकांचा विधानसभेत गोंधळ घातला.

Updated: Mar 7, 2018, 01:44 PM IST
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा विरोधकांचा दावा title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई  : सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा दावा करत विरोधकांचा विधानसभेत गोंधळ घातला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याची उंची कमी करण्यावरून विधानसभेत विरोधकांनी गोंधळ केला. त्यामुळे विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. 

सरकारवर हे आरोप

राज्य सरकराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आरखडा बदलला आहे. या नव्या आराखड्यात चौथऱ्याची उंची वाढवली आणि पुतळ्याची उंची कमी केली आहे. ही गंभीर बाब आहे, जनतेला वस्तुस्थिती कळाली पाहिजे. खर्च कमी करण्यासाठी हा बदल केला जातोय. ब्रांझचा पुतळा आहे, त्याची उंची कमी करून सिमेंटच्या चौथऱ्याची उंची वाढवली आहे. २६ डिंसेबर २०१६ ला केंद्राच्या पर्यावरण विभागाची जुन्या आराखड्याला मंजूरी मिळाली होती. नव्या आराखड्याला परवानगी घ्यावी लागणार आहे, त्यामुळे अजून काम सुरू करता आले नाही.

अजित पवार काय म्हणाले?

छत्रपतींचे नाव घेऊन राज्य करता आणि शिवस्मारकाची उंची कमी केली जाते. जगातलं सर्वात उंच स्मारक बनलं पाहिजे, त्याची इतिहासात नोंद झाली पाहिजे. उंची कमी करण्याचा प्रयत्न केला तर जनता तुम्हाला माफ करणार नाही त्याची किंमत मोजावी लागेल.

सरकारचं स्पष्टीकरण

हा महाराष्ट्राचा अस्मितेचा आणि स्वाभीमानाचा विषय आहे. मी सरकारच्या माध्यमातून जनतेला आश्वस्त करतो छत्रपतींचा हा पुतळा जगातील सर्वात मोठा पुतळा असेल. २१० मीटर उंचीचा हा पुतळा तयार करण्याचा निर्णय झाला, तो तेवढाच राहील याबाबत शंका उपस्थित करू नये. २००१ मध्ये हे स्मारक उभारण्याचा निर्णय झाला. मागच्या सरकारच्या वतीने मी जनतेची माफी मागतो २००१ ची घोषणा कार्यान्वित करण्यासाठी २०१८ उजाडावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारणाचा विषय करू नये.