Covid-19 JN.1 Variant : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. गेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा एकदा कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 14 रुग्णांचं निदान झालंय. मुंबईत 13 तर ठाण्यात एक रुग्ण आढळलाय. याचं प्रमुख कारण म्हणजे जेएन 1 हा नव्यानं आलेला व्हेरियंट असल्याचं बोललं जातंय. यासंबंधी केंद्राकडून राज्यातील आरोग्य मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. घाबरण्याचं कारण नसलं तरी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यायत. कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क (Mask) लावणे, समांतर अंतर ठेवणे आणि सॅनिटायझरचा वापर करावा असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.
मुंबई मनपा अलर्ट
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (Corona New Varient) मुंबई महापालिका (BMC) अलर्ट झालीय. महापालिकेनं कोरोना आढावा बैठक घेतलीय. आरोग्य व्यवस्थेला आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्याच्या, ऑक्सिजन बेड्स, आयसीयू आणि इतर यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. मुंबईत सद्यस्थितीला कोरोनाचे 17 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आज एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळलाय. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. प्रयोगशाळांची क्षमता, दवाखाने आणि मोठे हॉस्पिटल यांना अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आरटीपिसीआर टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार मास्कचा वापर लोक करू शकतात. हृदयाचे तसंच डायबेटिसच्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सद्यस्थितीला मुंबईत 17 कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. आज एक रुग्ण पोझिटिव्ह आलेला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सगळ्याच आढावा घेतला जातोय. ऑक्सिजन बेड्स, आयसीयू तसंच इतर यंत्रणा तयार आहेत आम्ही वारंवार सूचना आणि मार्गदर्शन घेत आहोत. हा व्हेरियंट सौम्य असल्याने घाबरण्याचे कारण नाही. लोकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलंय.
सिंधुदुर्गात पहिला रुग्ण
कोरोना व्हायरसचा नवीन उपप्रकार जेएन 1 चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलाय. हा रुग्ण 41 वर्षांचा पुरुष आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागानं केल्यायत. याचबरोबर कोरोना टेस्ट वाढविण्याचे निर्देशही देण्यात आलेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचाही आढावा घेण्यात आलाय.
केरळात कोरोनाचं थैमान
कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1नं केरळमध्ये धुमाकूळ घातलाय. कालच्या दिवसभारत केरळमध्ये कोरोनाचे 300 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजार 669वर पोहोचलीये. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 6 रुग्णांचा मृत्यू झालाय यातील तीन रुग्ण एकट्या केरळमधील आहेत तर दोन कर्नाटकातील आणि एक पंजाबमधील आहे.