मुंबई: मोदी सरकार अनेक उद्योगपतींना नियमबाह्य पद्धतीने लाभ पोहोचवत असल्याचा आरोप राहुल गांधी हे सातत्याने करत असतात. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या 'कॉर्पोरेट' लॉबीने काँग्रेस पक्ष गांधीमुक्त करण्याचा विडा उचलल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. दैनिक 'सामना'तील रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी काँग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांच्या पत्रप्रपंचाविषयी भाष्य केले आहे.
सोनिया गांधी आजारी असताना 'ते' पत्र आले; राहुल गांधी काँग्रेस नेत्यांवर नाराज
यामध्ये संजय राऊत यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवणाऱ्या नेत्यांना चांगलेच फटकारले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडतील व त्यानंतर सामुदायिक नेतृत्त्व म्हणून हे 'पत्रलेखक' काँग्रेसवर ताबा मिळवतील हे सर्व भाजपला हवेच होते. संपूर्ण देश काँग्रेसमुक्त व्हावा, हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले नाही. तेव्हा काँग्रेस गांधी परिवारमुक्त करण्यासाठी काँग्रेसच्याच काही नेत्यांना भाजप व कॉर्पोरेट उद्योगपतींनी हाताशी धरले. राहुल गांधी हे सतत सरकारच्या व्यवहारांवर टीका करत आहेत. अनेक उद्योगपतींना मोदी सरकारने नियमबाह्य पद्धतीने लाभ पोहोचवल्याचा आरोपही राहुल गांधी करत असतात. यामुळे अस्वस्थ झालेल्या कॉर्पोरेट लॉबीनेच काँग्रेस गांधीमुक्त करण्याचा विडा उचलला. सोनिया, प्रियांका आणि राहुल गांधी काँग्रेसच्या सक्रिय कार्यातून दूर व्हावे व मार्गदर्शक मंडळाचे सभासद म्हणून काम करावे असे या सर्व मंडळींचे डावपेच होते. ते सफल झाले नाहीत, असे काँग्रेसमधील मोठ्या गटाचे म्हणणे असल्याचे राऊत यांनी सांगितले.
राहुल गांधींचा घाव ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी, कपिल सिब्बल म्हणाले...
याशिवाय, सोनिया गांधी यांना पत्र लिहणाऱ्या २३ नेत्यांपैकी एकाचीही काँग्रेसचे अध्यक्षपद भुषवण्याची कुवत नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे. अशोक गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारायला तयार होतील का? याचे उत्तर 'अजिबात नाही' असेच आहे. प्रत्येकाला स्वत:ची खुर्ची हवी आहे. पक्षासाठी त्याग करायला कोणीच तयार नाही. स्वातंत्र्यानंतरही नेहरू परिवाराबाहेरचेच लोक काँग्रेसच्या अध्यक्षपदी होते. मात्र, कामराज यांच्या काळात काँग्रेस पक्ष फुटला. तर सीताराम केसरी यांच्या काळात काँग्रेस संघटना रसातळाला गेली. अखेर सोनिया गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यावर पक्षाने पुन्हा उभारी घेतली, असे राऊत यांनी म्हटले आहे.