किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ, नेव्ही-आर्मीसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ आले असून  ते आज दुपारी अलिबागला धडकण्याचा आताचा अंदाज आहे.  

Updated: Jun 3, 2020, 06:42 AM IST
किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ, नेव्ही-आर्मीसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज  title=

मुंबई  : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ आले असून  ते आज दुपारी अलिबागला धडकण्याचा आताचा अंदाज आहे. इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे. या वादळामुळे नासधुस होऊ नये, मनुष्य हानी होऊ नये यासाठी नेव्ही, आर्मीसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे,  सर्व टीम्स सर्व आयुधांसह सज्ज आहेत. सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क झाला असून सर्वांना सुखरूप समुद्रातून बाहेर काढून घरी आणण्यात आले आहे. नागरिकांनी ही घरातच राहणे हिताचे असून  वेळप्रसंगी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची गरज पडली तर प्रशासनाला सहकार्य करावे,  असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

 केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा यांनी या आपत्तीच्या प्रसंगी केंद्रसरकार राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, हे चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. या वादळात ताशी १०० ते १२५ कि.मी वेगाने वारे वाहतील. या वादळाने नुकसान होऊ नये म्हणून एनडीआरएफच्या १५ व एस.डी.आर.एफच्या ४ अशा १९ टीम तैनात करण्यात आल्या आहेत, ५ टीम राखीव ठेवण्यात आल्या असल्याचेही ते म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना इजा होऊ द्यायची नाही याची काळजी शासनही घेत आहे म्हणूनच बांद्राकुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये सुरु करण्यात आलेल्या फिल्ड रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तशाचप्रकारे सर्वांनी काळजी घ्यायची आहे. शेड, मोडकळीला आलेल्या इमारती याचा अजिबात आश्रय घ्यायचा नाही.   कुठे वायुगळती झाली असेल  किंवा केमिकल जर कुठे पडले असेल  तर तिकडे काय होतेय हे पहायला अजिबात जायचे नाही. असे काही होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतू  दुर्देवाने असे काही घडल्यास प्रशासन काळजी घेईल, नागरिकांनी तिकडे जाऊ नये. स्वत: सुरक्षित राहून जिथे मदत करता येणे शक्य आहे तिथे मदत करावी. यातून आपण होणारे नुकसान थोपवू शकू. आपण कोरोनाशी लढत आहोतच निसर्गही आता आपली परिक्षा पाहात आहे. पण आपण सर्वजण मिळून त्याला पूर्ण ताकतीने सामोरे जाऊ आणि या संकटातून सहिसलामत बाहेर येऊ,  असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.