कळसूत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडलं, देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

'ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलिन केलं'

Updated: Mar 11, 2022, 03:52 PM IST
कळसूत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडलं, देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका title=

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर (Maharashtra Budget) विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तसंच ठाकरे विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अर्थसंकल्पावरुन ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे. कळसूत्री सरकारने विकासाची पंचसूत्री मांडल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. 

याला योगायोग म्हणावं काही काय हे मला माहित नाही, पण नेहमी अर्थमंत्री बजेट मांडतात, त्यानंतर विरोधी पक्षाची प्रतिक्रिया देतात, पण इथे मात्र ज्यांनी बजेट मांडलं तेच आधी प्रतिक्रिया द्यायला आले, आणि विरोधी पक्ष आला तर इंटरनेट बंद आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. 

खरं म्हणजे कळसूत्री सरकारने विकासाचं पंचसूत्री मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, या पंचसूत्रीने काही होणार नाही. कारण या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलिन केलेलं आहे. आणि दोन वर्षात महाराष्ट्रातल्या गोरगरीब, दिनदलित, आदिवासी, शेतमजूर, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, बारा बलुतेदार सर्वांच्या तोडांला पानं फुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, 

आताचा जो अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे तो ही कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकत नाही.  बजेटमध्ये वृत्तपत्रात चौकट यावावी इतक्या चार बातम्या तयार होऊ शकतात, या व्यतिरिक्त कोणताही दिशा या बजेटला नाही,

मागील बजेटच्या घोषणा पुन्हा या बजेटमध्ये करायच्या, चालू कामांच्याच घोषणा बजेटमध्ये करायच्या, आमच्या सरकारच्या काळात सुरु असलेल्या  घोषणा पुन्हा या बजेटमध्ये सांगायच्या. मला एका गोष्टीचा आनंद आहे की पहिल्या वर्षात  आमच्या सर्व योजना बंद करणारं सरकार, आता त्याच योजनांचा विस्तार करुन त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतंय, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.