धारावीकरांनी आयुक्तांकडे केल्या 'या' मागण्या

 धारावीकरांनी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या 

Updated: Apr 9, 2020, 09:37 PM IST
धारावीकरांनी आयुक्तांकडे केल्या 'या' मागण्या  title=

मुंबई : धारावीमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढतना दिसत आहे. धारावीत आतापर्यंत कोरोनामुळे ३ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे ७ लाख जणांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाबाधितांची  वाढती संख्या पाहता धारावीकरांनी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत. धारावी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष एड. राजेंद्र कोरडे, तसेच अनिल कासारे, आरमुगम देवेंद्र, बालराज दामरगिद्दा, अख्तर हुसेन शेख, असगर हुसेन शेख यांनी हे पत्र आयुक्तांना पाठवले आहे. 

मागण्या पुढीलप्रमाणे 

धारावीतील सर्व हेल्थ पोस्ट, मनपा संचालित दवाखाने ज्या आजमितीस बंद आहेत, ते तात्काळ सुरू करण्यात यावेत

धारावीतील सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्यांकडून पैसे आकारणे बंद केल्यामुळे अनेक शौचालय चालकांनी शौचालये बंद केली आहेत वा पाणी - वीज खंडित केली आहे. अशी सर्व शौचालये ताब्यात घेऊन या संकट समयी मोफत सेवा पुरविण्यास तयार असलेल्या संस्थांना ती देण्यात यावीत.
शौचालयात जाताना आणि परतताना हात धुण्याकरिता पाणी - साबण किंवा सॅनिटायझरची उपलब्धता ठेवावी.

शौचाकरिता, किराणा घेणेकरिता तसेच औषधोपचाराकरिता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी मारहाण करू नये, असे निर्देश द्यावेत. ( धारावीतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात शौचालय नाही, याची कृपया नोंद घ्यावी)

धारावीतील उच्च घनता (साधारणतः १ लाख घरे, बहुतांश दुमजली. अंदाजे  लोकसंख्या १५ लाख) तसेच सरासरी १०० चौ.फु. क्षेत्रफळाच्या घरात राहणारे किमान ६ ते ८ जणांचे कुटुंब ही परिस्थिती लक्षात घेता घरातही सोशल डिस्टंसिंग पाळणे शक्य नाही. ही लोकं काही कारणाने बाहेर येतीलच. ती त्यांची अपरिहार्यता आहे. ही बाब लक्षात घेवून धारावी संपूर्णता सिल करण्याचा विचार डोक्यातून काढून टाकावा.

हेल्थ पोस्टच्या पॅरा मेडिकल स्टाफला प्रशिक्षित करून, धारावीतील घरोघरी जावून कोविड - १९ ची टेस्ट करण्याची व्यवस्था करावी.

धारावीतील सर्व खाजगी दवाखाने (dispensaries) तात्काळ  सुरू करणे, RMP डॉक्टर्सना अनिवार्य करावे. असे न करता सेवा देण्यापासून पळ काढणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.

धारावीतील पर राज्यातील मजुरांना ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, अशांना शासनाच्या वतीने पुरविणे आवश्यक असलेले मोफत अन्न - धान्याचे वितरण तात्काळ सुरू करावे.

धारावीतील ५१ बेड्सचे ' साई हॉस्पिटल ' पालिकेने ताब्यात घेतले आहे, त्याचप्रमाणे धारावीतील पालिकेचे अर्बन हेल्थ सेंटरची इमारत ताब्यात घेऊन ती वापरात आणावी. 

धारावीपासून जवळच असलेले शीव येथील ' शेठ र. व. आयुर्वेद रुग्णालय' सुद्धा ताब्यात घेता येऊ शकते. तसेच धारावी परिसरातील रहेजा, हिंदुजा, मेहता, लिलावती आदी विश्वस्त न्यासांच्या रुग्णालयातील काही बेड्स ताब्यात घेण्यात यावीत.