सावधान...! मुंबईत होतेय ड्युप्लिकेट मोबाईलची विक्री

फोन खरेदी करताना सावधान... 

Updated: Dec 2, 2019, 10:07 PM IST
सावधान...! मुंबईत होतेय ड्युप्लिकेट मोबाईलची विक्री

रुचा वझे, झी मीडिया, मुंबई : पन्नास हजारापासून एक लाख रुपयांपर्यंतचा मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण काळ्या बाजारात महागड्या फोनच्या ड्युप्लिकेट कॉपीज तयार झाल्यात. ओरिजनल फोन स्वस्तात देतो असं सांगून अनेकांच्या माथी ड्युप्लिकेट फोन मारले जात आहेत.

तुम्ही नवीन महागडा मोबाईल खरेदी केला असेल तर मित्रांमध्ये मिरवण्याआधी तुमचा मोबाईल शंभरवेळा पाहा. कारण तुमचा मोबाईल बोगस असण्याची शक्यता वाढली आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरात आयफोनसारखे दिसणारे ड्युप्लिकेट मोबाईल विकले जात आहेत. हे मोबाईल आयफोन असल्याचं भासवून ग्राहकांकडून हजारो रुपये उकळले जात आहेत. हे मोबाईल एवढे सफाईदारपणं बनवले जातात की तुम्ही ते बनावट आहेत याचा विचारही करु शकत नाही. मुंबईतल्या मस्जिद बंदर परिसरात असे फोन सर्रास विकले जातात. मुंबई पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बनावट आयफोन जप्त करण्यात आले आहेत.

मुंबईत काही ऑनलाईन विक्रेते स्वस्तात आयफोन देण्याचं आमिष दाखवून ग्राहकांना जाळ्यात ओढतात. स्वस्तात फोन मिळाला म्हणून ग्राहक खूश असतात. पण चायनामेड फोन गळ्यात बांधून त्यांना फसवलेलं असतं. हे कळायलाही त्यांना बराच वेळ जातो.

बोगस आयफोन ओळखण्यासाठी काही साध्या सोप्या टिप्स सांगितल्या जातात. अस्सल आयफोनपेक्षा बनावट आयफोन आकाराला मोठे असतात. ड्युप्लिकेट आयफोन हा वजनानं हलका असतो. तर ड्युप्लिकेट मोबाईलचा बॅक कव्हर अगदीच साधा वाटतो. बोगस आयफोनचा बॉक्स मोठा असतो आणि त्यावरील अॅपलचा लोगो करड्या रंगातला असतो. तर अस्सल आयफोनच्या बॉक्सवरील लोको सोनेरी रंगाचा असतो. 

दुसरी मोठी गोष्ट म्हणजे अस्सल आयफोनचा लोगो त्याच्या बॅककव्हरमध्ये घट्ट बसलेला असतो. बोगस आयफोनचा लोगो नखानं ओरबाडूनही काढता येतो. अस्सल आयफोनच्या चार्जरवर अॅप्पलचा लोगो असतो. तर बोगस आयफोनवर वेगळीच माहिती असते. थोडासा डिस्काऊंट मिळतो म्हणून ड्युप्लिकेट मोबाईल गळ्य़ात बांधून घेऊ नका. थोडंसं सावध राहा. नाहीतर महागड्या मोबाईलऐवजी तुमच्या हातात डब्बा फोन येऊ शकतो.