'मी मुख्यमंत्रीपद ब्राह्मणाला दान केले', वक्तव्यावर खडसेंकडून ब्राह्मण समाजाची दिलगिरी

नुकतेच भाजपामधून राष्ट्रवादी पक्षात दाखल झालेले, एकनाथ खडसे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन समस्त ब्राह्मण समाजाची दिलगिरी

Updated: Nov 9, 2020, 04:38 PM IST
'मी मुख्यमंत्रीपद ब्राह्मणाला दान केले', वक्तव्यावर खडसेंकडून ब्राह्मण समाजाची दिलगिरी title=

मुंबई : नुकतेच भाजपामधून राष्ट्रवादी पक्षात दाखल झालेले, एकनाथ खडसे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन समस्त ब्राह्मण समाजाची दिलगिरी व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे यांनी ट्ववीट करुन दिलगिरी व्यक्त केली आहे. ब्राह्मण समाजाच्या संघटनांनी इशारा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी हे ट्ववीट केले आहे.

दिलगिरी व्यक्त करताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे, दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच  पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

एकनाथ खडसे यापूर्वी नेमकं काय म्हणाले होते?

हा नाथाभाऊ दिलदार आहे. नाथाभाऊ तुम्ही आता घरी बसा, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. असं मला सांगितलं गेलं. त्यावर मी म्हटलं, मी भल्याभल्यांना दान देतो, मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. तेव्हा मी मुख्यमंत्रीपद ब्राह्मणाला दान केले. 

एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला टाकण्यात आले. त्याच व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. अशा लोकांमुळेच मला भाजपा सोडावा लागला, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं होतं.

तर खडसे यांचा एकही कार्यक्रम पुण्यात होवू देणार नाही

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जे ब्राह्मण समाजाबाबत वक्तव्य केलं आहे, ते त्यांनी मागे घ्यावं, अन्यथा पुण्यात एकनाथ खडसे यांचा एकही कार्यक्रम होवू देणार नाही. 

एवढंच नाही तर पुण्यातील पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिसून येतील असा इशारा देखील आनंद देव यांनी दिला होता. यासंदर्भात आनंद देव यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निवेदन देखील दिले आहे.