मुंबई : राज्यात इंग्रजी शाळा विरूद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला आहे. महाराष्ट्रात 'मेस्टा' संघटनेशी संलग्न शाळांनी शाळा सुरू करण्याची तयारी दाखवलीय. मेस्टाशी संबंधित 18 हजार शाळा राज्यात आहेत. त्यातील अनेक शाळांनी शाळा सुरू करण्याबाबत तयारी दर्शवली आहे.
ग्रामीण भागातील पहिली ते बारावी आणि शहरी भागातील मुंबई वगळता इतर ठिकाणी आठवी ते बारावी शाळा सुरू करण्याची 'मेस्टा' या संघटनेने तयारी दर्शवली आहे. दरम्यान पालकांनीही घरी राहून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून शाळा सुरु करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलंय. मात्र राज्य सरकारनं शाळा सुरू करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही.
चार ते पाच दिवसात निर्णय?
एकीकडे इंग्रजी शाळा सुरू करण्यावर मेस्टा ठाम आहे तर दुसरीकडे इतर शाळाही कधी सुरू होणार यावरून खल सुरू आहेत. शाळांबाबत मुख्यमंत्री 4 ते 5 दिवसांत सीएम निर्णय घेतील असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हंटलंय. शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालंय हे खरं असलं तरी कोरोना काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, असंही त्यांनी सांगितलं.
'शाळा सुरु कराव्यात'
कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे म्हणून शाळा बंद ठेवणं, न्याय्य नसल्याचं मत जागतिक बँकेचे शिक्षण संचालक जॅमी सावेड्रा यांनी व्यक्त केलं आहे. शाळा सुरू राहिल्याने करोनाचा कहर होईल किंवा शाळा हे असुरक्षित ठिकाण आहे याचे कोणतेही पुरावे नसल्याने कोरोनाकाळात शाळा बंद करण्याचे समर्थन करता येणार नाही, असे ते म्हणाले.