मुंबई : 'शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, "एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. आघाडीवर होते.
सीमा भागात जाऊन त्यांनी लढे दिले व पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह होता. महाराष्ट्राच्या विरोधात कोणी ''ब्र'' काढलाच तर शिवसेनाप्रमुखांच्या बरोबरीने ''एन. डी.'' उभे राहिलेच म्हणून समजा.
"अखंड महाराष्ट्रात बेळगावसह सीमा भाग यावा हा त्यांचा ध्यास होता. एखाद्या वादळासारखे ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या लढ्यात उतरत. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे अतोनात नुकसान झाले असून मी त्यांना महाराष्ट्र राज्यातर्फे आणि शिवसेनेतर्फे अभिवादन करतो," अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.