हुक्क्याच्या कोळशामुळे पबमध्ये लागली आग?

मुंबईच्या कमला मिलमध्ये वन अबाव्ह पबमध्ये लागलेल्या आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी पबमध्ये मिळत असलेला हुक्का हेही एक कारण असल्याचं बोललं जातंय.

Updated: Dec 29, 2017, 08:45 PM IST
हुक्क्याच्या कोळशामुळे पबमध्ये लागली आग? title=

मुंबई : मुंबईच्या कमला मिलमध्ये वन अबाव्ह पबमध्ये लागलेल्या आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी पबमध्ये मिळत असलेला हुक्का हेही एक कारण असल्याचं बोललं जातंय. संपूर्ण मुंबईत खरंतर हुक्कापार्लरला परवानगी नाही. महापालिकेने एकाही हुक्का पार्लरला परवानगी दिलेली नाही. तरीही हुक्का पार्लर सर्रास सुरू आहेत.

लोअर परळचे मोजो आणि वन अबाव्ह पब आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीमुळे गुदमरून १४ जणांचे बळी गेलेत. पब का जळाला याचा शोध घेतला जातोय. विविध कारण सांगितली जात आहेत. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मात्र पबमध्ये सर्व्ह होत असलेल्या हुक्क्याच्या कोळशामुळे सुरूवातीला आग लागली. त्यानंतर ही आग भडकली असल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय. 

आमदार नितेश राणे यांनीही आगीसाठी अवैधरित्या दिला जात असलेल्या हुक्क्याला जबाबदार धरलंय. एका प्रत्यक्षदर्शीने त्यांना ही माहिती दिल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली. 

नितेश राणे यांच्याप्रमाणेच हुक्क्यामुळेच आग लागल्याचा दावा केईएमचे फॉरेन्सिक्स डॉक्टर राजेश डेरे यांनीही केलाय. एका रूग्णानेच आपल्याला ही माहिती दिल्याचं डॉक्टर म्हणतायत.

संपूर्ण भिन्न पार्श्वभूमी असलेल्या दोन जबाबदार व्यक्तींनी केलेले हे दोन दावे अजिबातच नजरेआड करता येणार नाही. संपूर्ण मुंबईत हुक्का पार्लरना आणि हॉटेलांमध्ये हुक्का वितरणासाठी परवानगी नाही. तरीही मुंबईत गल्लोगल्ली हुक्का पार्लर उभी राहिली आहेत. हुक्का ओढणे हे उच्चभ्रू वर्गातच नाही तर मध्यम वर्गातही स्टेटस सिंबॉल होऊ लागलंय.

महापालिका आणि पोलीस मात्र केवळ बघत बसल्याचं चित्रं आहे.. पोलिसांनी अशा हुक्का पार्लरवर कारवाई करावी अशी मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे बुधवारीच केली होती. 

हुक्क्यामुळे तरूणांना व्यसनांच्या जाळ्यात ओढलं जातंय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय आणि आगी लागण्याची शक्यताही वाढलीय. गल्लोगल्लीत फोफावलेल्या हुक्का पार्लरमुळे नागरिकही हैराण झालेत. महापालिकेने संपूर्ण शहरात एकाही हुक्का पार्लरला परवानगी दिली नसतानाही अवैधपणे हुक्का पार्लर सुरू कशी याचं उत्तर महापालिका, पोलीस यांनी दिलं पाहीजे. 

हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी पोलीस आणि महापालिका यांच्यात समन्वय का नाही. अशा हुक्का पार्लरना अभय देणाऱ्या अधिका-यांच्या मुसक्या बांधणं गरजेचं आहे.