मुंबईतल्या मुलींच्या पहिल्या मराठी शाळेचं अस्तित्वच नष्ट होणार?

या शाळेची इमारत २०१४ मध्ये धोकादायक ठरवण्यात आली आणि तिचं वीज,पाणीही तोडण्यात आलं. 

& Updated: May 26, 2018, 10:57 PM IST
मुंबईतल्या मुलींच्या पहिल्या मराठी शाळेचं अस्तित्वच नष्ट होणार? title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांनी सुरू केलेली मुंबईतली मराठी माध्यमाची पहिली मुलींची शाळा यंदाच्या पावसाळ्यात पडण्याची भीती आहे. गिरगावातल्या ठाकूरद्वारजवळची ही मुलींची पहिली मराठी माध्यमाची शाळा... १८४९ साली नाना शंकरशेठ यांनी ही शाळा सुरु केली... नंतर १९६२मध्ये मुंबई महापालिकेनं ही वास्तू आणि शेजारचं मैदान ताब्यात घेतलं.. पण शाळा मात्र नाना शंकरशेट यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट लिटररी सायंटिफिक एज्यूकेशन या संस्थेमार्फत चालवली जायची. शाळेची इमारत महापालिकेच्या ताब्यात असल्यानं तिच्या दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची होती. पण महापालिकेनं मोडकळीला आलेल्या या इमारतीची दुरुस्ती केली नाही.

संबंधित संस्थेनं महापालिकेकडे दुरुस्तीची परवानगी मागितली... ती परवानगीही महापालिका देत नाही.... अखेर या शाळेची इमारत २०१४ मध्ये धोकादायक ठरवण्यात आली आणि तिचं वीज,पाणीही तोडण्यात आलं. त्यामुळे इथं शिकत असलेल्या २०० मुलींची तात्पुरती पर्यायी व्यवस्था संस्थेच्या दुसऱ्या शाळेमध्ये करण्यात आली. ही शाळा म्हणजे मुंबईतली ऐतिहासिक वास्तू आहे.. अशा वास्तूची दुरुस्ती करुन तिचं जतन करण्याची गरज व्यक्त केली जातेय. महापालिका मात्र त्याकडे दुर्लक्ष करतेय.  

शाळेतल्या मुलींना खेळण्यासाठी शाळेच्या जवळच मैदानही आहे. पण महापालिकेनं  शाळा आणि मैदानाच्या मध्ये भिंत घातलीय. त्यामुळे मैदानाच्या जागेत बाग तयार करून त्याचा फायदा शेजारी होत असलेल्या बिल्डरांच्या प्रकल्पासाठी कसा होईल? याचं नियोजन केलं जात असल्याचा आरोप करण्यात येतोय.
 
मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेल्या नाना शंकरशेट यांचं नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्याची मागणीही होतेय. तसंच त्यांचं स्मारकही निधीअभावी रखडलंय. त्यातच आता त्यांनी सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचे अस्तित्व पुसलं जात असताना कुणीच याकडं लक्ष देत नाहीय. दरम्यान या प्रकरणाबाबत सी विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त उदय शिरूरकर यांनी या वास्तूचे जतन करण्याबाबत शिक्षण विभागाशी सल्लामसलत करून निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.