गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, महामार्गावर वाहतूक कोंडी, रेल्वे स्थानकात तुफान गर्दी

Ganeshotsav 2023 : संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: कोकणात हा सण मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो. राज्यभरात असलेले चाकरमनी गणेशोत्सवासाठी आवर्जुन कोकणात जातात. त्यामुळे महामार्ग आणि रेल्वे स्थानकांवर लोकांची तुफान गर्दी पाहिला मिळत आहे. 

Updated: Sep 17, 2023, 04:19 PM IST
गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, महामार्गावर वाहतूक कोंडी, रेल्वे स्थानकात तुफान गर्दी title=

Ganeshotsav 2023 : आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालेल्या कोकणातील चाकरमान्यांनी (Chakarmani) कोकणात  (Konkan) जाण्यासाठी एकच गर्दी केलेली बघायला मिळाली. दिवा रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी असून शनिवार पासूनच चाकरमानी आपल्या गावाकडे रवाना होतायत. मिळेल त्या वाहनांनी गावी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. मुंबई ठाणे परिसरातून बसेसही रवाना करण्यात आल्यात. रेल्वेने गाड्या वाढवल्या असल्या तरी त्याही कमी पडल्याचं दिसून येतंय.. मंगळवारी गणपती आगमन होत असताना दोन ते तीन दिवस आधीच चाकरमानी गावी जात आसल्याने प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून येतंय. (Traffic Jam on the Highway Heavy Rush at the Railway Station)

महामार्गावर तुफान कोंडी
मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची तुफान कोंडी झालीय. नागोठणेजवळ वाकण फाटा इथं ट्रॅफिक जाम झालंय. वाकण ते नागोठणेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी होतेय.. गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचं हाल होत आहेत. कोकणात जाणाऱ्या सर्वच ट्रेन 3 ते 4 तास उशिरानं धावत आहेत. त्यामुळे दादर, ठाणे, दिवा स्थानकांत प्रवाशांची गर्दी वाढू लागलीये. मध्य रेल्वेचंही वेळापत्रक कोलमडलंय..रेल्वे वाहतूक खोळंबल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहिला मिळालं.

मुंबई-पुणे मार्गावर वाहनांच्या रांगा
मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटर रांगा लागल्याने चाकरमन्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. खालापूर टोल नाका ते कुंभवली पर्यंत 4 ते 5 किलोमीटरपर्यंत हलक्या आणि जड वाहनांच्या रांगा लागल्यात. गणेशोत्सव  आणि विकेंडकरिता मुंबई, ठाणे, नवी मुंबईहून पुणे, कोल्हापूरहून कोकणात, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात गणेश भक्त आणि पर्यटक निघाल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडी झालीय.  रत्नागिरीतही मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहिला मिळालं. संगमेश्वर बाजारपेठ ते शास्त्रीपूल वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

स्वारगेट बस स्थानकावरही गर्दी
गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातही गर्दी केलीये.. रिझर्वेशन खिडकीपासून लागलेल्या लांगा बसस्थानकाच्या बाहेर गेल्यात.. बसमध्ये जागा मिळवण्यासाठीही प्रवाशांची झुंबड उडत आहे..

रायगडमध्ये गणेशोत्सावाची लगबग
रायगडमध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू झालीय. बाजारात खरेदीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. सजावटीसाठी विविध आकर्षक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. विविध प्रकारची फुलं, माळा, तोरणे, लॉन सजावट ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.  लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडकर आतुरतेनं वाट पाहत आहेत. गणेशभक्तांनी खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केलीय. गणरायाची आरास करण्यासाठी भाविक आवश्यक साहित्य खरेदी करतायेत.