प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबईत शेती होत नाही हे तुम्हा आम्हाला माहिती आहे. पण एका पठ्ठ्यानं चक्क मुंबईतल्या घरात शेती केली. शेतीत चक्क गांजा पिकवला. पण पोलिसांनी ही नशेची शेती उद्ध्वस्त केलीय. मुंबईतल्या माहुलमधील हे पडकं घर पाहा. या घरात शेती होत होती. हो आम्ही म्हणतो ते खरं आहे. या घरात गांजाची शेती होत होती.
निखिल शर्मा नावाचा तरुण त्याच्या साथीदारांसह मिळून ही गांजाची शेती करत होता. निखीलचं इंजिनिअरिंगपर्यंतचं शिक्षण झालंय. गेल्या काही महिन्यापूर्वी तो अंमली पदार्थ विकणाऱ्यांच्या संपर्कात आला.
तेव्हा त्याला गांजाची शेती करण्याची कल्पना सुचली. त्यानं बंदीस्त खोलीत हायड्रोपोनिक ग्रो सिस्टिमच्या सहाय्यानं घरातल्या घरात गांजा पिकवायला सुरुवात केली. यासाठी त्यानं घरात एक तंबू उभारुन गांजाची रोपं लावली.
स्वतःची शेती म्हटल्यावर निखिल आता गांजाचं उत्पादन आणि विक्रीही करु लागला होता. पण चेंबूर पोलीस गस्तीवर असताना निखील पोलिसांना दिसला आणि तिथंच त्याचा डाव फसला. पोलिसांनी त्याच्याकडून एक किलो गांजा जप्त केला.
निखिलनं गांजाच्या शेतीसाठीची सगळी माहिती इंटरनेटवर सर्च केली. शेतीची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यानं गांजाची शेती केली आणि नशेचा बाजार मांडला. पण त्याचा हा खेळ फार दिवस चालला नाही.