महत्त्वाची बातमी! शॉपिंग मॉलमध्ये लस न घेताही 'यांना' मिळणार प्रवेश

ब्रेक द चेनच्या सुधारित आदेशात यासाठी तरतुद करण्यात आली आहे

Updated: Aug 16, 2021, 07:25 PM IST
महत्त्वाची बातमी! शॉपिंग मॉलमध्ये लस न घेताही 'यांना' मिळणार प्रवेश title=

मुंबई : राज्यात कोविड संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना अनलॉकच्या दिशेने सर्वात मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे. ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे. पण हे निर्णय घेताना नियम आणि अटींचं बंधन घातलं आहे, जे नागरिकांना पाळावं लागणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.

राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटर मधील दुकानं रात्री दहावाजेपर्यंत उघडी ठेवण्यास सूट देण्यात आली आहे. त्यासाठी मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना, दुकान मालकांना आणि या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस पूर्ण आणि 14 दिवस पूर्ण झालेले असतील तरच प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र तसंच फोटोसहित ओळखपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखवणं आवश्यक असणार आहे.

18 वर्षाखालील मुलांना परवानगी

ब्रेक दी चेनच्या सुधारित आदेशात 18 वर्षांखालील मुलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 18 वर्षाखालील मुलांचं लसीकरण अद्याप सुरु न झाल्याने 18 वर्षाखालील वयोगटातील मुलांना मॉलमध्ये प्रवेश करण्यास मुभा देण्यात आली आहे. पण त्यासाठी वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवणं आवश्यक असणार आहे.