अतिवृष्टीचा राज्यातील रस्त्यांनाही तडाखा, 'इतक्या' कोटी रुपयांचं नुकसान

अतिवृष्टी, महापूर आणि दरड दुर्घटनांमुळे राज्यातील रस्त्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे 

Updated: Jul 31, 2021, 05:32 PM IST
अतिवृष्टीचा राज्यातील रस्त्यांनाही तडाखा, 'इतक्या' कोटी रुपयांचं नुकसान

मुंबई : अतिवृष्टी राज्यात अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. पूर परिस्थिती, दरड दुर्घटना या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक संसार उद्धव्स्त झाले, अनेक बळी गेले. मुसळधार पावसाचा तडाखा राज्यातील रस्त्यांनाही बसला आहे. राज्यातील रस्त्यांचं सुमारे 1 हजार 800 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

'राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते आणि पुलांचे प्रचंड नुकसान झालं  अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. सर्वाधिक सुमारे 700 कोटी रूपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झालं आहे. त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग आणि नाशिक विभागाचा क्रम आहे. 

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानीची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजूनही अनेक ठिकाणी पाऊस सुरू असून, दरडी साफ करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे, तर अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त रस्त्यांची छायाचित्रे आणि ड्रोन चित्रिकरणाच्या माध्यमातून प्राथमिक हानीचा अंदाज काढण्यात आला आहे. 

प्राथमिक अंदाजानुसार 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. 469 रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती तर 140 पूल आणि मोऱ्या पाण्याखाली गेले होते. अंतिम पाहणी अहवालात नुकसानाच्या रक्कमेत आणखी वाढ होण्याची शक्यता.