मुंबई : आता बाईक किंवा स्कूटर काढताना हेल्मेट घरी विसरणं किंवा हेल्मेटच्या वापराचा कंटाळा करणं तुमच्यासाठी महागात पडणार आहे. हे चालवणाऱ्यालाच नव्हे तर बाईकवर मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी आहे. आता बाईक किंवा स्कूटीवर बसणाऱ्या दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.
मुंबई शहरामध्ये अनेक मोटार सायकलस्वार हे हेल्मेटविना बाईक चालवतात. यामध्ये बाईक चालवणाऱ्याच्या मागे बसलेली व्यक्ती (pillion rider ) हे हेल्मेटचा वापर करीत नाहीत. मात्र आता असं केल्यास मागच्या व्यक्तीची पावती फाडली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 15 दिवसांमध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. यानुसार बाईक चालवणाऱ्याला आणि मागे बसणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तींना हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे. यामध्ये विनाहेल्मेट बाईक किंवा स्कुटी चालवण्यास पाचशे रूपये दंड किंवा 3 महिने लायसन्स रद्द होऊ शकतं.
मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात आदेश काढला असून येत्या 15 दिवसांमध्ये त्याची अंमलबजावली केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता 15 दिवसांनंतर स्कुटी किंवा बाईकने बाहेर जाणार असाल तर हेल्मेट घेतल्याची खात्री करा.