मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनलला जोडणारा हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या नीरज देसाईंविरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले. पुलाची संरचनात्मक तपासणी करून चुकीचा निष्कर्ष दिल्याने अपघात घडल्याचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅबच खाली कोसळल्याने त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले होते. कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील आणि सहायक अभियंता एस. एफ. काकुळते अशी त्यांची नावे. तर निवृत्त प्रमुख अभियंता एस. ओ. कोरी आणि निवृत्त उपप्रमुख अभियंता आर. बी. तरे यांचीही सविस्तर चौकशी केली जाणार होती. दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर झाला असून, दुर्घटनाग्रस्त हिमालय पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट योग्य प्रकारे करण्यात आलं नसल्याचं समोर आले. हे ऑडिट करणाऱ्या डी डी देसाई असोशियटसला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आला होता.