घाटकोपर स्थानकात चेंगराचेंगरी, मोठा अनर्थ टळला

घाटकोपर स्थानकात मोठी घटना टळली.

Updated: Sep 4, 2019, 07:03 PM IST
घाटकोपर स्थानकात चेंगराचेंगरी, मोठा अनर्थ टळला title=

मुंबई : सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था बंद झाली. घरी जाण्यासाठी प्रवाशांची लोकल पकडण्यासाठी धावपळ सुरू आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकावर बदलापूर लोकल आली तेव्हा ही लोकल पकडण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली. यावेळी प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले. चेंगराचेंगरीची घटना घडली. पण सुदैवाने कोणतीही अनर्थ घटना घडली नाही. इतर प्रवाशांनी खाली पडलेल्या लोकांनी उचललं. चेंगराचेंगरीमुळे अनेकांना त्रास झाला. रेल्वे सुरळीत होत नाही. तोपर्यंत कार्यालयातून बाहेर पडू नका. रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने गाडी पकडण्यासाठी मोठी तारांबळ उडत आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. मुंबई आणि उपनगरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मरे पुन्हा एकदा कोलमडली. दुपारी 12 नंतर मध्य रेल्वेची वाहतूक बंद झाली. सायन ते माटुंगा दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. गेल्या 6 तासांपासून मरे ठप्प असल्याने प्रवाशी अडकून पडले आहेत. सकाळी कामावर आलेल्या चाकरमान्यांची घरी जाण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे आता दादर आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी उसळली आहे. 

पावसामुळे सीएसएमटी ते ठाणे वाहतूक लोकलसेवा ठप्प आहे. सीएसटीहून एकही लोकल सोडली जात नाही आहे. सर्व इंडिकेटर्स देखील बंद आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.