लॉकडाऊनमुळे प्रचंड नुकसान; खाजगी बस संघटनांचं मूक आंदोलन

लॉकडाऊनच्या काळात खाजगी बस व्यावसायिकांना मोठ्या समस्या निर्माण होत आहेत.

Updated: Jun 15, 2020, 10:39 PM IST
लॉकडाऊनमुळे प्रचंड नुकसान; खाजगी बस संघटनांचं मूक आंदोलन title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेले निर्बंध आणि लॉकडाऊनच्या काळात खाजगी बस व्यावसायिकांना मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. त्याचं मोठ नुकसानही झालं आहे. लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्याकरता बस संघटनांतर्फे मूक आंदोलन करण्यात आलं.

मुंबई बस मालक संघटना (MBMS), बस ऑनर्स सेवा संघ (BOSS) आणि स्कूल अँड कंपनी बस ऑनर्स असोसिएशन (SBOA) या संघटनांतर्फे सोमवारी मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील, एकसर गाव लिंक रोड जवळ मूक आंदोलन करण्यात आलं होतं. या तिन्ही संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि सभासदांनी आंदोलनामध्ये सहभाग घेत, सोशल डिस्टेनसिंगचे पालन करत आपला निषेध नोंदवत काही मागण्या केल्या आहेत.

लॉकडाउनच्या काळात खासगी बस व्यावसायिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. हजारो बसेस आज व्यवसायाअभावी तशाच उभ्या आहेत. वाहन कर एक वर्षासाठी माफ करण्यात यावा, ज्या वाहनधारकांनी आगाऊ कर भरलेला आहे, त्यांना पुढील कर समांतर करुन द्यावा, अशा मागण्या बस संघटनांतर्फे करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राशेजारील इतर राज्यांमध्ये करांमध्ये सूट देण्यात आली आहे. वाहनविम्याचा कालावधी लॉकडाऊन संपेपर्यंत वाढवून देण्यात यावा, वाहतूकदारांनी जे कर्ज काढलेलं आहे, ते भरण्यासाठी रिजर्व बँकेने जी मुदतवाढ दिली आहे, त्यावरील व्याज माफ करण्यात यावं, किमान एक वर्षासाठी जीएसटी माफ करण्यात यावा, तसेच आमच्या कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा घोषित करून त्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

त्याशिवाय, खाजगी बस मालकांना व्यवसायात पुन्हा उभं राहण्यासाठी प्रति परवाना ५०,००० रुपयांचं आर्थिक पॅकेज सरकारतर्फे जाहीर करण्यात यावं,सर्व प्रवासी वाहतूकदारांना इंधन दरांमध्ये सबसिडी देण्यात यावी, सार्वजनिक प्रवासी वाहनांना पार्किंग सुविधा शासनातर्फे देण्यात यावी, तसंच पार्किंग फी माफ करण्यात यावी, ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या मागील ई चलनचा दंड माफ करण्यात यावा, प्रवासी वाहनांना डिसेंबर महिन्यापर्यंत टोल शुल्क माफ करण्यात यावा, या सर्व मागण्या मान्य करून सरकारने वाहतूकदारांच्या समस्या सोडवाव्या असं संघटनांकडून सांगण्यात आलं आहे. 

मुंबई महानगर क्षेत्रात आमच्या व्यवसायातून तब्बल १,५०,००० लोकांना रोजगार मिळतो. ४,५०,००० लोकांचं जीवन या व्यवसायावर अवलंबून आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १५ लाख लोक या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतात. आज खाजगी बस वाहतूक बंद असल्याने या लोकांचं जगणे कठीण झालं आहे. खाजगी वाहतूकदारकांचा व्यवसाय बंद असल्याने राज्याचं सरासरी ५०० करोड रुपये प्रति महिना नुकसान झालेलं आहे, सरकारने याबद्दल विचार करुन त्वरित मदत करण्याचं, मुंबई बस मालक संघटनेचे सचिव हर्ष कोटक यांनी सांगितलं आहे. जर सरकारने येत्या १० दिवसांत वाहतूकदार व्यावसायिकांना मदत केली नाही, तर आम्ही सर्व बसेस आरटीओमध्ये पार्क करणार असल्याचा इशाराही हर्ष कोटक यांनी दिला आहे.