इथे पोटनिवडणुकीत हार म्हणजे, भाजपला मित्रपक्षांच्या कुबड्यांची गरज नक्की!

२०१४ नंतरचा इतिहास पाहिला तर, झालेल्या सर्व पोटनिवडणुकांपैकी बहुतांश पोटनिवडणुका भाजप पराभूतच झाला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकांमध्ये जनता काय कौल देते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 21, 2018, 10:20 PM IST
इथे पोटनिवडणुकीत हार म्हणजे, भाजपला मित्रपक्षांच्या कुबड्यांची गरज नक्की! title=

नवी दिल्ली : तेलगु देशम पक्षाचे (टीडीपी) खासदार थोटा नरसिम्हन आणि वायएसआर काँग्रेसचे वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीसही सभापतींना दिली आहे. पण, लोसभेतील गदारोळ काही केल्या थांबेना आणि तेलगू देशम पक्षाला (टीडीपी) सरकारविरोधात अविश्वास काही आणता येईना. पण, भाजपनेही आपण अविश्वास ठरावास सामोरे जायला तयार आहोत, असे संख्याबळाच्या जोरावर सांगितले आहे. पण, भाजपची ही स्थिती कायम राहील याची शाश्वती नाही. सध्या भाजपकडे स्वबळावर २७४ जागा आहेत. म्हणजेच बहुमताच्या आकड्यासाठी लागणाऱ्या २७२ आणि वर आणखी दोन अतिरिक्त. मात्र, येत्या काळात होणाऱ्या लोकसभेच्या तीन पोटनिवडणुका जर भाजप पराभूत झाली तर, भाजपला विरोधातील अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यासाठी मित्रपक्षांच्या कुबड्यांची गरज भासणार आहे.

त्या लक्ष्यवेधी जागा कोणत्या?

एकूण तीन पोटनिवडणुकांपैकी दोन जागा या महाराष्ट्रातीलच आहेत. ज्यापैकी एक खासदारकीचा राजीनामा देऊन नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या नाना पटोले यांच्या भांडारा-गोंदिया मतदारसंघातून आहे. तर, दुसरी पालघर मतदारसंघातील खासदार चिंतामन वनगा यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आहे. याशिवाय तिसरी जागा आहे ती कौराना. या मतदारसंघातून १९९८ ते १०१४ या काळात सातत्याने निवडून आलेले खासदार हुकूम सिंह यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या तिनही जागेवर पोटनिवडणुका होणार आहेत.

भाजपसमोर स्वबळाचा आकडा राखण्याचे आव्हान

ज्या तीन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. त्या पैकी सर्वच्या सर्व जागा (३) भाजपला जिंकाव्याच लागणार आहेत. अन्यथा भाजपचा स्वबळाचा आकडा घसरणार आहे. नेमके हेच आव्हान भाजपसमोर आहे. त्यात २०१४ नंतरचा इतिहास पाहिला तर, झालेल्या सर्व पोटनिवडणुकांपैकी बहुतांश पोटनिवडणुका भाजप पराभूतच झाला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकांमध्ये जनता काय कौल देते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.