कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी ; रेल्वे, रस्ते, टोलनाक्यांवर कशी आहे स्थिती ? जाणून घ्या !

रात्री 8 पासून कडक लॉकडाऊन सुरू 

Updated: Apr 23, 2021, 11:01 AM IST
कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी ; रेल्वे, रस्ते, टोलनाक्यांवर कशी आहे स्थिती ? जाणून घ्या ! title=

मुंबई : राज्यात काल रात्री 8 पासून कडक लॉकडाऊन सुरू झालाय. मुंबईसह अनेक शहरांमध्ये पोलिसांनी नाकाबंदी सुरू केलीय. त्यानुसार प्रत्येक वाहनाची काटेकोर तपासणी केली जातेय. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सोडलं जातंय... मुंबईत लोकलमधून सामान्यांना प्रवासाची बंदी घालण्यात आलीय. लोकलमध्ये देखील अत्यावश्यक सेवा म्हणजेच शासकीय कर्मचारी, मेडिकल क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. 

सर्वसामान्यांना लोकल प्रवास करण्यास मनाई आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वेस्थानकात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कल्याण रेल्वे स्थानकावर फक्त तीन ठिकाणांहून प्रवेश देण्यात येत होता. प्रत्येक प्रवेश द्वारावर पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. पोलीस प्रवाशांना ओळख पत्र बघूनच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात होता. त्याचप्रमाणे तिकीट काऊंटरवर देखील ओळखपत्र तपासूनच  तिकीट दिले जात होते.

मुंबईतल्या सर्वच रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कोणालाही रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जात नाही..

लॉकडाऊन 2 ची ठाण्यात अंमलबजावणी सुरू झालीय. पोलीस रेल्वे स्थानकांत कर्ण्यावरून प्रवाशांना सूचना देत होते. स्टेशनवर प्रवाशांचे आयकार्ड चेक करूनच प्रवेश दिला जातोय. कोणी गर्दी केली तर कारवाईचा इशारा दिला जातोय.

कडक लॉकडाऊन सुरु झाल्यानं मुलुंड टोल नाक्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जाते.

कडक लॉकडाऊन सुरु असूनही नवी मुंबईतल्या सायन पनवेल महामार्गावर वाहनांची वर्दळ कायम आहे. पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आल्याचं दिसत नाहीय. नाकाबंदीसाठी 700 पोलीस कर्मचारी आणि 198 होमगार्ड तैनात केले जाणार आहेत. मात्र अद्यापही नाकाबंदी सुरु करण्यात आलेली नाही.