राज्यात दुसऱ्या टप्प्यात ५५.३७ टक्के मतदान

राज्यातल्या दहा मतदारसंघात ५५.३७ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.  

Updated: Apr 18, 2019, 07:48 PM IST
राज्यात दुसऱ्या टप्प्यात ५५.३७ टक्के मतदान title=

मुंबई : राज्यातल्या दहा मतदारसंघात ५५.३७ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. सर्वाधिक मतदान बीडमध्ये तर सोलापुरात सर्वात कमी मतदान झाला आहे. देशातील ९५ मतदारसंघांत ६१.१२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये झाले आहे. त्यानंतर मणिपूर आणि आसामचा नंबर लागतो.

महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार होते. २० हजार ७१६ मतदान केंद्रे होती. राज्यात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाडय़ातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदान झाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराव अडसूळ, प्रीतम मुंडे यांच्यासह राज्यातील १७९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले.

मतदानाची टक्केवारी

- बुलडाणा ५७.०९ टक्के  
- अकोला ५४.४५ टक्के, 
- अमरावती ५५.४३ टक्के  
- हिंगोली ६०.६९ टक्के  
- नांदेड ६०.८८ टक्के  
- परभणी ५८.५० टक्के  
- बीड ५८.४४ टक्के  
- उस्मानाबाद ५७.०४ टक्के  
- लातूर ५७.९४ टक्के
- सोलापूर ‎५१.९८ टक्के.