सांभाळून बोला! जितेंद्र आव्हाड यांचा क्रांती रेडकरला सल्ला

नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देणाऱ्या क्रांती रेडकरला जितेंद्र आव्हाड यांनी सल्ला दिला आहे  

Updated: Oct 27, 2021, 11:08 PM IST
सांभाळून बोला! जितेंद्र आव्हाड यांचा क्रांती रेडकरला सल्ला

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरु केली आहे. धर्मांतराचा आरोप केल्यानंतर नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा समोर आणला. तसंच समीर वानखेडे यांचा आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांशी संबंध असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. 

'मंत्री असल्यासारखं वागा'

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने उत्तर दिलं आहे. नवाब मलिक वाटेल ते आरोप करत आहेत, त्यांच्या जावई 8 महिने जेलमध्ये होता, त्याला निर्दोष सिद्ध करण्यात मलिक यांनी वेळ घालवावा. समीर वानखेडे जे निष्पक्ष कारवाई करतायत, त्यांच्या अंगावर करप्शनचा एकही डाग नाही, त्याला खोट्या आरोपात फसवण्याचा प्रयत्न करु नये, त्यांना मी हात जोडून विनंत करते. तुम्ही एक मंत्री आहात, मंत्री असल्यासारखे वागा, असं क्रांती रेडकर हिने म्हटलं आहे.

नवाब मलिक यांच्याकडून सत्ता आणि पैशाचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप क्रांती रेडकरने केला आहे. क्रांती रेडकरने केलेल्या या आरोपांना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. 

जितेंद्र आव्हाड यांचा सल्ला

समीर वानखडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी माझ्या महाराष्ट्रात मला धमकी दिली जात आहे, जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलायला हवं असा सल्ला दिला आहे. तसंच ;आम्ही जर का मागचा इतिहास काढला तर महागात पडेल आणि लक्षात येईल की हमाम मे सब नंगे है' असा इशाराही त्यांनी दिला आहे. पत्नी म्हणून ती तिचं कर्तव्य पार पाडत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

'धर्म लपवल्याचा आरोप चुकीचा'

निकाहनामाची कागदपत्र माझ्या सासूबाईंनी बनवला होता ज्या मुस्लीम धर्मीय होत्या, त्याचा आणि माझ्या सासऱ्यांचा आणि माझ्या पतीचा काहीही संबंध नाही, असं क्रांती रेडकरने म्हटलं आहे. समीर वानखेडे तेव्हाही हिंदू होते, आणि आताही हिंदूच आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांच्या जातीचा उल्लेख आहे. समीर वानखेडे यांनी स्पेशल मॅरेज अॅक्टखाली लग्न केलं. त्याची कागदपत्रही आमच्याकडे आहेत. स्पेशल मॅरेज अॅक्टमध्ये तेव्हाच होतं, जेव्हा दोन वेगळ्या धर्माची लोकं लग्न करतात. त्यामुळे समीर वानखेडे यांनी आपली धर्म लपवला हा आरोप चुकीचा आहे असं क्रांती रेडकरने म्हटलं आहे.