जे.जे रूग्णालयातील कामगार आणि परिचारिका संपावर

 कामगार आणि परिचारिका संपावर

Updated: Aug 7, 2018, 12:21 PM IST
जे.जे रूग्णालयातील कामगार आणि परिचारिका संपावर title=

मुंबई : जे.जे रूग्णालयातील चतुर्थ श्रेणी कामगार आणि परिचारिका संपावर आहेत. आमच्या विविध मागण्या सरकारने पूर्ण कराव्या तरच आम्ही काम करू. आजच्या संपामुळे रूग्णांचे प्रचंड हाल होत असले तरी आम्हाला आंदोलन करण्यासाठी सरकारने प्रवृत केले आहे असे आंदोलकांचं म्हणणे आहे. 

शासकीय घाटी रुग्णालयातील 800 परिचारिका दोन दिवसांच्या संपावर आहेत. विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. परिचारिकांच्या जागेवर नर्सिंगच्या विद्यार्थिनी काम करणार आहेत. नियमित शस्त्रक्रिया मात्र रद्द करण्यात आल्या असून अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

आजपासून सरकारी कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. जवळपास १७ लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम असले तरी अधिकारी संपात सहभागी होणार नाहीत. सरकारबरोबर झालेल्या बैठकीत अधिकारी महासंघानं हा निर्णय घेतला आहे. मात्र सतरा लाख कर्मचारी संपावर ठाम आहेत. पाच दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचं वय ५८ वरून ६० करण्याबाबत दिवाळीत निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे. या संपामुळे राज्यातल्या अनेक यंत्रणांवर मोठा परिणाम होणार आहे.

राज्य सरकारानं काल रात्री दोन शासन निर्णय जारी केले. त्यानुसार १ जानेवारी २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आलाय.  तसंच १४ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचा जीआरही रात्री जारी करण्यात आला.