जोगेश्वरीत अनोखी होळी, आगीत पोळी न जाळता भुकेलेल्यांना देणार पुरणपोळी

जोगेश्वरीतील जागरूक नागरिक मंच आगळ्यावेगळ्या पद्धतीने होळी साजरी करणार आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Mar 1, 2018, 03:41 PM IST
 जोगेश्वरीत अनोखी होळी, आगीत पोळी न जाळता भुकेलेल्यांना देणार पुरणपोळी title=
मुंबई : देशभरात होळीच्या पवित्र सणाची धामधूम सुरू आहे. एकमेकांवर रंगाची उधळण करत, पुरणपोळी वाटत हा सण साजरा केला जातो. 
 
पण जोगेश्वरीतील जागरूक नागरिक मंच आगळ्यावेगळ्या पद्धतीने होळी साजरी करणार आहे.

सामाजिक बांधिलकीची होळी 

होळीच्या आगीमध्ये पोळी टाकण्याची परंपरा पूर्वापार सुरू आहे. या परंपरेला छेद देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न होळीच्या निमित्ताने होणार आहे.
 
होळीच्या आगीत जळून पोळी खाक होते. पण हीच पोळी भुकेलेल्यांना दिली तर त्याच वेगळ समाधान सर्वांनाच मिळेल.
 
याच हेतूने जोगेश्वरीतील जागरूक मंचातर्फे होळीनिमित्त पुरणपोळ्या गोळा करुन त्या गरीब, गरजू आणि भुकेलेल्यांना देण्यात येणार आहे. 

तुम्हीही साजरी करा अशी होळी 

या समाज उपयोगी कार्यक्रमात आपणही सहभागी व्हावे आणि आपआपल्या ठिकाणी अशा पद्धतीची होळी साजरी करावी असे आवाहन जागरूक नागरिक मंचातर्फे निरंजन आहेर यांनी केलंयं. 
 
होळीच्या रात्री या पोळ्या गोळा करुन दुसऱ्या दिवशी सकाळी यांचे वाटप करण्यात येणार आहे. जोगेश्वरीमध्ये गेली ४ वर्षे हा उपक्रम सुरू आहे.