लॉकडाऊन : लोकांसमोर कोणत्या अडचणी?

 लॉकडाऊनमध्ये घरातच असलेले नागरिक आणि हातावर पोट असलेले कष्टकरी यांच्या अडचणी दूर करण्याचं आव्हानही आहे.  

Updated: Mar 26, 2020, 04:58 PM IST
लॉकडाऊन : लोकांसमोर कोणत्या अडचणी? title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाचा धोका ओळखून आधीच पावलं उचलणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांचं कौतुक होत आहे. लोक घरीच राहतील आणि घराबाहेर लोकांच्या संपर्कात येणार नाहीत याची खबरदारी जशी सरकारला घ्यावी लागणार आहे, तसंच लोकांपुढे असलेल्या छोट्यामोठ्या अडचणी दूर करण्याचं आव्हानही ठाकरे सरकारला पेलावं लागणार आहे. आधी सरकारचं आवाहन झुगारून रस्त्यावर फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर जशी टीका झाली, तशीच बुधवारी पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनुकूल -प्रतिकुल मतं सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे सरकारला आता एकीकडे कोरोनाच्या आपत्तीशी वैद्यकीय पातळीवर लढावं लागत आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये घरातच असलेले नागरिक आणि हातावर पोट असलेले कष्टकरी यांच्या अडचणी दूर करण्याचं आव्हानही आहे. शिवाय कमी मनुष्यबळ घेऊन राबणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेसह हे आव्हान पेलावं लागणार आहे.

लॉकडाऊननंतर राज्यात काय आहे परिस्थिती?

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन दिवसांत नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. झी २४ तासच्या प्रतिनिधींना ठिकठिकाणी फिरताना याचा अनुभव येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या शहरांतून झी २४ तासचे प्रतिनिधी दीपक भातुसे, अरुण मेहेत्रे, किरण ताजणे आणि प्रताप नाईक या प्रतिनिधींनी टिपलेल्या नागरिकांना भेडसावणाऱ्या या अडचणी.

मुंबईकरांसमोर या अडचणी

१.सिलिंडर होम डिलेव्हरी बंद केल्यानं गॅस एजन्सीकडे गर्दी होत आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर घरपोच कसा करता येईल यावर मार्ग काढावा.

२.मुंबईच्या भाजीमार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी होते. सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्स राहील याची काळजी घ्यावी.

३.भाजीचे दरही वाढले आहेत. आधीच कामधंदा बंद आहे. त्यात लोकांना महागडी भाजी खरेदी करावी लागत आहे. वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळत नाही. त्यामुळे भाजीचे दर वाढवणाऱ्या दलाल आणि व्यापाऱ्यांवर कारवाई करावी. दूध व अन्य वस्तुही वाढीव दराने विकल्या जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.

४.किराणा माल संपला आहे. २१ दिवस लॉकडाऊन असल्यानं लोकांनी एकदम खरेदी केली. अन्नधान्य आणि अन्य वस्तू मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मालाची पुरवठा वेळीच होईल याची सरकारनं काळजी घ्यावी.

५.मुंबईसारख्या शहरात बेघर आणि भिकाऱ्यांची अवस्था वाईट आहे. त्यांना जेवण मिळेल यासाठी यंत्रणा उभारावी.अनेक रुग्णांना हॉस्पिटलला डायलेसिससाठी जावे लागते. त्यांना अडचणीशिवाय प्रवास करता येईल याची व्यवस्था करावी. त्यांना वाहनानं जायचं असेल तर पेट्रोलपंपावर पेट्रोल उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी.

पुण्यात काय आहेत अडचणी?

१. हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कष्टकऱ्यांबाबत सरकारनं अजून उपाय केलेला नाही. त्यांना दोन महिन्याचं रेशन मोफत मिळावं अशी अपेक्षा आहे.
पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. काही सामाजिक संघटना फूड पॅकेट्स पोहोचवत आहेत, मात्र पुरेसे नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था उभारावी लागेल.

२. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवण्यात येते. त्यांना आरटीओकडून आता पास दिले जात असून ही यंत्रणा विनाअडचण कार्यरत राहील याची खबरदारी घ्यायला हवी.
स्वच्छता कामगार, हमाल, दूधवाले त्यांच्या सेवा अत्यावश्यक असूनही त्यांना संरक्षण नाही. पोलिसांचा मार खावा लागत आहे. यावर धोरण ठरवून या घटकांना शहरात फिरताना, कामाच्या ठिकाणी जाताना त्रास होणार नाही याची व्यवस्था करावी.

३.पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे. ते सामान्य नागरिकांवर राग काढत आहेत. पोलिसांना सूचना देऊन बळाचा वापर करताना नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

४. नागरिकांकडून औषधांची मागणी वाढली आहे. औषध दुकानांमध्ये तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना करावी. सरकारनं जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा.

कोल्हापुरात रुग्ण आणि शेतकऱ्यांच्या अडचणी

१. लोक बाजारात मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. गर्दी टाळायची असेल तर ग्रामपंचायत, तसेच वॉर्ड स्तरावर वितरण यंत्रणा उभारता येईल का याचा विचार व्हावा. किंवा घरपोच सेवा देणारी यंत्रणा उभारावी.

२,दवाखाने बंद असल्यानं लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वैद्यकीय अडचण मोठ्या प्रमाणात आहे. ही अडचण दूर करावी.

३.शेतकऱ्यांना पशुखाद्य मिळण्यात अडचणी येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.

४.भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना खताची गरज असते. ते कसे उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावं.

५.भाजीपाला वाहतुकीला सुरुवातीलाच अडचणी आल्या. आता गाडीवर अत्यावश्यक सेवा आणि भाजीपाला असे लिहावे असे सरकारनं सांगितलं आहे. पण वाहतूक सुरळीत व्हावी याकडे लक्ष द्यावे.

नाशिकमध्ये शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण

१. भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी नियोजन आवश्यक, वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र उभारण्याची गरज वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिकांची अडचण, ज्यांची मुले बाहेर आहेत. त्यांना बँकेत जाणे, अन्नधान्य खरेदीसाठी बाहेर जाण्यातही अडचण आहे. त्यांच्या मदतीसाठी उपाययोजना करावी.

२.शेतकरी अडचणीत आहे. गहू, कांदे पिकं काढणीला आली आहेत. त्यात पाऊस पडतोय. लॉकडाऊनमुळे मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. या अडचणीवर मार्ग काढावा.

३. शेतमाल वाहतुकीतील अडथळे दूर करावेत.

४. द्राक्ष निर्यात करणं शक्य होत नाहीय. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. नुकसान कमी करणं किंवा टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आवश्यक