Maharashtra ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? राज्य सरकारने काढला जीआर

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे.

Updated: Nov 8, 2021, 05:31 PM IST
Maharashtra ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? राज्य सरकारने काढला जीआर title=

मुंबई : एसटीच्या संपावर अखेर तोडगा दृष्टीपथात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत समिती नेमण्याचा जीआर सरकारनं काढला आहे. समिती स्थापन झाल्याशिवाय संप मागे न घेण्याची कामगार संघटनांची भूमिका संघटनांनी घेतली होती. आता संपाबाबत संघटनांची भूमिका पाहणं महत्त्वाचं आहे. जीआर वाचल्यानंतर निर्णय़ घेण्यात येईल, असं कामगार नेत्यांनी म्हटलंय. विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

सरकारने काढला जीआर

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीत महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव आणि परिवहनचे अप्पर मुख्य सचिव यांचा समावेश आहे. ही समिती महामंडळ कर्मचारी संघटना आणि महामंडळाचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या शिफारशी असलेला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करेल. मुख्यमंत्री त्यांचं मत/शिफारशीसह मुंबई उच्च न्यायालयात सादर करतील. ही सर्व कार्यवाही समितीला 12 आठवड्यांच्या आत पूर्ण करावी लागणार आहे. 

महाराष्ट्राची जीवनवाहिनी ठप्प

महाराष्ट्राची जीवनवाहिनी ठप्प झालीय. एसटी कामगारांचा संप चिघळला आहे. आज राज्यात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. विविध एसटी स्थानकातली वाहतूक ठप्प आहे. बहुतांश आगारात कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी एसटी ठप्प आहे. राज्यभरातील तब्बल 220 डेपो बंद आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. असं असताना खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट देखील सुरू आहे. एस टी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.