उत्साह मावळला; भाजप कार्यालयांत शुकशुकाट

रिकाम्या खुर्च्या... शांत वातावरण..... 

Updated: Oct 24, 2019, 01:02 PM IST
उत्साह मावळला;  भाजप कार्यालयांत शुकशुकाट  title=

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेनंतर गुरुवारी महाराष्ट्रात मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणी आणि निकालांची एकंदर आकडेवारी समोर येण्यापूर्वीच सत्ताधारी भाजप कार्यालयाबाहेरील परिसरात मोठ्या जल्लोषाची तयारी केल्याचं पाहायला मिळालं. 'विश्वासाचा जनाधार, महाराष्ट्राचे महाआभार' असं म्हणत कल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्या भाजपच्या गोटात मात्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

१२२ विजयी उमेदवारांचा आकडा गाठता न आल्यामुळे अद्यापही भाजपच्या कार्यालयांमध्ये कमालीची शांतता पाहायला मिळत आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट येथे असणाऱ्या भाजप कार्यालयाबाहेर एक व्यासपीठ बांधण्यात आलं असून, तेथे होणाऱ्या अपेक्षित गर्दीसाठी खुर्च्या, आनंदोत्सव साजरा करण्यासाठी खुर्च्या अशी एकंदर व्यवस्था करण्यात आली होती. पण, तिथे फार कोणीच फिरकल्याचं दिसत नाही.

LIVE : निवडणुकीचं महाकव्हरेज, राज्यभरात मतमोजणीला सुरुवात 

पण, निकालांचे कल पाहता अपेक्षित आकडेवारी दिसत नसल्यामुळे कुठेच लाडूही वाटण्यात आलेले नाही तर जल्लोषाची चिन्हंही दिसत नाही आहेत. एकिकडे निकालांचे कल हाती येण्यास सुरुवात झाली तेव्हाच चंद्रकांत पाटील यांनी महायुतीला २५० जागांवर विजय मिळणार, असल्याचं भाकित मोठ्या आत्मविश्वासाने केलं होतं. पण, आता मात्र हा आत्मविश्वास आ़णि ओसंडून वाहणारा उत्साह याचं एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. तेव्हा आता अंतिम निकाल वातावरणातील ही शांतता भेदण्याची संधी देणार का हे पाहणं अतीशय महत्त्वाचं ठरणार आहे.