चुकीला माफी नाही; CAA विरोध करणाऱ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

केंद्र सरकार नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) अंमलबजावणीवर ठाम आहे.

Updated: Mar 4, 2020, 11:56 AM IST
चुकीला माफी नाही; CAA विरोध करणाऱ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी title=

मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) ठराव मांडणाऱ्या महाराष्ट्रातील दोन नेत्यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. परभणीच्या पालम नगरपरिषदेतील उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे आणि सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी आपापल्या नगरपरिषदांमध्ये CAA, NRC आणि NPR विरोधात ठराव संमत करून घेतला होता. त्यांनी हा ठराव केंद्र सरकारकडेही पाठवला होता. यानंतर महाराष्ट्र भाजपकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोकडे व बोराडे यांच्या हकालपट्टीचे पत्रक जारी केले आहे. CAAच्या विरोधात प्रस्ताव आणून रोकडे व बोराडे यांनी पक्षविरोधी कृत्य केले आहे. ही कृती शिस्तभंग करणारी असल्याने त्यांना पक्षातून काढण्यात येत आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. 

सध्या देशभरात CAA आणि NRC वरून आंदोलने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच यावरून दिल्लीत दंगल भडकली होती. मात्र, केंद्र सरकार नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) अंमलबजावणीवर ठाम आहे. हा कायदा कोणत्याही परिस्थितीत देशात राबवायचाच. त्यावरून माघार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले होते. 

मात्र, बाळासाहेब रोकडे आणि विनोद बोराडे यांनी आपापल्या नगरपरिषदांमध्ये CAA, NRC आणि NPR विरोधात ठराव मांडून ते मंजूर करवून घेतले. भाजपचीच सत्ता असलेल्या नगरपरिषदांमध्ये हा प्रकार घडल्याने पक्षाची चांगलीच नाचक्की झाली. त्यामुळे महाराष्ट्र भाजपकडून या दोन्ही नेत्यांना तात्काळ बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.