मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये, सरकारी नोकरी

मराठा क्रांती आंदोलनात ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि नोकरी देण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता

Updated: Aug 12, 2020, 07:10 PM IST
मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये, सरकारी नोकरी

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मराठा क्रांती आंदोलनात ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि नोकरी देण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता. या निर्णयाबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

दरम्यान या निर्णयाचं मराठा आरक्षणासाठीचे वकिल विनोद पाटील यांनी स्वागत केलं आहे. या निर्णयाबद्दल अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळाचे आभार मानत असल्याचं विनोद पाटील म्हणाले. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटे हे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवा आणि त्यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी द्या, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली होती. पण एकनाथ शिंदे यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. अशोक चव्हाण गांभीर्याने काम करत आहेत. उपसमितीचं काम अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली चांगलं चाललं आहे. ते वेळोवेळी आढावा घेत असतात, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.