मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर होणार शस्त्रक्रिया, पाठीचा आणि मान दुखीचा त्रास

मुख्यमंत्र्यांवर होणार शस्त्रक्रिया 

Updated: Nov 10, 2021, 05:48 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर होणार शस्त्रक्रिया, पाठीचा आणि मान दुखीचा त्रास title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल होणार आहे.  मानेच्या आणि मणक्याच्या तपासणीसाठी उद्धव ठाकरे रुग्णालयत जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. याबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या तपासण्या होणार आहे. तपासण्यांनंतरच शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेले काही दिवस पाठीचं आणि मान दुखीचा त्रास होत आहे. हा त्रास अधिक बळावू नये यासाठी H N रिलायंन्स रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छोट्या शस्त्रक्रियेचा पर्याय सूचवला आहे.

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली मात्र पुन्हा एकदा मान आणि पाठ दुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला आहे. पण शस्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार होती. मात्र त्यांनी सध्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना हा त्रास जाणवत असून त्यांनी भेटीगाठीही टाळल्या आहेत. काल पंढरपूरमधील पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. पण या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा लावलेला दिसला. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.  पाठदुखी आणि मानेच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास होत असल्यामुळे काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठदुखी आणि मानेचा स्नायूच्या दुखापतीमुळे पट्टा लावण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच त्यांची तब्येत आता ठीक असल्याची माहिती दिली आहे.