मुंबई: कोरोना व्हायरसच्या Coronavirus वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार खासगी लॅब्सना कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपयेच आकारता येतील. यापूर्वी कोरोनाच्या टेस्टसाठी साधारण ४४०० रुपये आकारले जात होते. खासगी लॅब्समध्ये यावर इतर कर लागून कोरोना टेस्टची किंमत बरीच जास्त होती. मात्र, आता सरकारने या टेस्टसाठी २२०० रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारू नयेत, असा आदेश काढला आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरातून रक्ताचे आणि स्वॅबचे नमुने गोळा केले जात असतील तर त्यासाठी २८०० रुपये आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने कोरोना टेस्टसाठी किंमत निश्चित करुन दिल्यामुळे आता खासगी लॅब्सकडून होणारी लूट थांबणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना : गेल्या २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन रुग्ण, मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा
Maharashtra Government caps maximum price for #COVID19 tests (RT-PCR) at Rs 2200, the earlier price was 4400. Maximum price for the test by collecting samples from home capped at Rs 2800. pic.twitter.com/l1TsEIs6ij
— ANI (@ANI) June 13, 2020
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. यानंतर खासगी लॅब आणि राज्य सरकार यांच्यात चर्चाही झाली होती. या बैठकीत खासगी लॅबनी कोरोना टेस्टची किंमत कमी करण्याची तयारी दर्शविली. सध्या राज्यात RT-PCR तपासणीची सुविधा असलेल्या ४४ सरकारी आणि ३६ खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. यापैकी सरकारी लॅब्समध्ये कोरोना टेस्ट मोफत केली जात आहे.